अबब... एक किलो चॉकलेटसाठी २४००० लिटर पाणी; रमण विज्ञान केंद्राच्या ‘वॉटर गॅलरीत’ जाणून घ्या ‘वॉटर फूटप्रिंट’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 05:48 AM2019-12-04T05:48:58+5:302019-12-04T05:50:02+5:30
आधुनिक शौचालयाच्या एक फ्लशसाठी २४ लिटर पाणी खर्च होते.
- निशांत वानखेडे
नागपूर : लहान मुलांची आवडती खाण्याची वस्तू कोणती असे विचारले की त्यांच्या तोंडून पटकन ‘चॉकलेट’ हेच नाव निघेल. पण एक किलो चॉकलेट विक्रीला येईपर्यंत तब्बल २४००० लिटर पाणी खर्च होते.
आपण रोजच्या गोष्टी करताना किती पाणी खर्च होते, यालाच ‘वॉटर फूटप्रिंट’ असे संबोधले जाते. येथील रमण विज्ञान केंद्रातील ‘वॉटर गॅलरी’त ‘वॉटर फूटप्रिंट’ या प्रदर्शनात तुम्हाला रोजच्या गोष्टीसाठी किती पाणी खर्च होते, याची आश्चर्यकारक माहिती मिळेल. ज्या वस्तूपासून चॉकलेट तयार होते, कारखान्यातील प्रक्रिया व नंतर पॅकेजिंग अशा विविध गोष्टी करताना पाण्याची गरज पडते, या सर्वांची बेरीज होते २४000 लिटर. आहारातील शेंगदाणे, कोबी, आंबा, सफरचंद, शेंगदाण्याचे तेल, सूर्यफूल, गहू, गव्हाचे एक किलो पीठ, ब्रेड, तांदूळ, चहा, कॉफी, भाजीपाला, चपाती,भात असे सर्व पदार्थ ताटात येईपर्यंत किती पाणी लागते, याची सर्व माहिती गॅलरीच्या चार्टमध्ये मिळते.
आधुनिक शौचालयाच्या एक फ्लशसाठी २४ लिटर पाणी खर्च होते. बादलीने पाणी घेतले तर १0 लिटरमध्ये अंघोळ होते, मात्र तेच शॉवरचा उपयोग केल्यास प्रति मिनिटाला १५२ लिटर व कमी फ्लोच्या शॉवरमध्ये मिनिटाला ९२ लिटर पाणी खर्च होते. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात दर दिवशी १0२0 लिटर पाणी लागते आणि सौर ऊर्जा निर्मितीस केवळ ९८ लिटर. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मितीला चालना मिळाली तर दर दिवशी ९२२ लिटर पाण्याची बचत होऊ शकते, ही बाब येथे लक्षात येते.
२.५ टक्के शुद्ध पाणी
पृथ्वीवर ७१ टक्के पाणी असले तरी त्यातील ९७ टक्के समुद्रातील पाणी निरुपयोगी आहे आणि मानवी उपयोगासाठी केवळ २.५ टक्के
शुद्ध पाणी उपलब्ध आहे. तेही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपल्या प्रयत्नाने थोडे थोडे पाणी जरी वाचविले तर जलसंवर्धन करण्यास थोडी मदत होईल, हे सांगण्याचा हा प्रयत्न होय, अशी भावना केंद्राचे शिक्षक अभिमन्यू भेलावे यांनी व्यक्त केली.