नागपूर मनपा ‘परिवहन’चा २४४.८२ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:38 PM2018-05-24T22:38:53+5:302018-05-24T22:49:57+5:30

महापालिकेच्या ‘आपली बस’मधून शहीद जवानांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास सवलत दिली जाणार आहे. पुढील वर्षात नवीन बस डेपोंची उभारणी, इलेक्ट्रीक व बायोगॅस बसेससह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन समितीचा २०१८-१९ या वर्षाचा २४४.८२ कोटी उत्पन्न व २४४.५७ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना सादर केला.

244.82 crores budget for Nagpur Municipal Transport | नागपूर मनपा ‘परिवहन’चा २४४.८२ कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर मनपा ‘परिवहन’चा २४४.८२ कोटींचा अर्थसंकल्प

Next
ठळक मुद्देवीर माता, भगिनींसाठी मोफत प्रवास : गतवर्षीच्या आठ संकल्पांची पूर्तता केल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’मधून शहीद जवानांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास सवलत दिली जाणार आहे. पुढील वर्षात नवीन बस डेपोंची उभारणी, इलेक्ट्रीक व बायोगॅस बसेससह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन समितीचा २०१८-१९ या वर्षाचा २४४.८२ कोटी उत्पन्न व २४४.५७ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना सादर केला.
अर्थसंकल्पात २५.०३ लाख शिल्लक गृहीत धरण्यात आली आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात परिवहन विभागाला बस तिकीटातून ६१ कोटी २२ लाख ८७ हजारांचा महसूल प्राप्त झाला. शासनाकडून अपेक्षित १०८ कोटींचे अनुदान व महापालिकेकडून इस्त्रो खात्यासाठी अपेक्षित ६० कोटी मिळालेले नाही. म्हणजेच विभागाचे प्रत्यक्ष उत्पन्न ६१.२२ कोटी असून खर्च १२७.६८ कोटी आहे. पुढील वर्षात ही रक्कम मिळण्याची आशा आहे. अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात इथेनॉल इंधनावर संचालित ५५ ग्रीन बस, तीनही डिझेल बस आॅपरेटरच्या माध्यमातून २३६ डिझेल बस, १५० मिडी बस तसेच महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी स्वतंत्र तेजस्वीन मिडी बसेस संचालित करण्याचा महापालिकेचा मानस आहे. पर्यावरणपूरकधोरणानुसार २५ बायोगॅस बसेस, ७० इलेक्ट्रिक बसेस अशा एकूण ५३६ बस ‘आपली बस’ च्या ताफ्यात दाखल होत आहे.
शहिदांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास
परिवहन विभागातर्फे मॉ जिजाऊ मोफत प्रवास सवलत योजनेंतर्गत देशासाठी कर्तव्यावर तैनात असताना शहीद झालेल्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागातील शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील शहीदांच्या वीर माता, वीर भगिनी आणि वीर कन्या यांना ‘तेजस्विनी बस ’ तथा सर्वच शहर बस सेवेतील बसमध्ये मोफत बस पास उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बसथांब्यालगत वॉटर एटीएम
बसथांब्यालगत वॉटर एटीएमची निर्मिती करण्यात येणार असून, त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, सौर ऊर्जेद्वारे विद्युत निर्मिती करून इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी त्याचा उपयोग यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अपंगांसाठी व्हीलचेअर
समाजकल्याण विभागातर्फे प्रमुख बसस्थानकावर व्हीलचेअरची उपलब्धता, बसस्थानकावर वेळापत्रक लावणे, जाहिरात कंत्राट देऊन उत्पन्न स्रोत वाढविणे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या थांब्यावर शेड नाही अशा ६०० थांब्यावर नावीन्यपूर्ण फलकाची निर्मिती करून थांब्यावरील बस पार्किंगची जागा राखीव करण्याकरिता नावीन्यपूर्ण रंगसंगतीचे पेंटिंग करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

डेपोसाठी नवीन जागा
सध्या डिझेल बस आॅपरेटर्सकरिता असलेल्या डेपोव्यतिरिक्त शहराच्या पूर्व भागात वाठोडा येथे मनपाच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बसडेपोकरिता जागा विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ग्रीन बस आॅपरेटरकरिता वाडी नाका येथे डेपोकरिता जागा विकसित करून देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. खापरी नाका येथे इथेनॉल पंप उभारणी करण्यात आली आहे.

आठ संकल्पांची पूर्ती
मागील वर्षी दहा संकल्प समितीने निश्चित केले होते. त्यातील आठ संकल्प पूर्णत्वास आल्याचा दावा बंटी कुकडे यांनी केला आहे. मागणीनुसार ६५ नवीन मार्गावर नव्याने बसफेऱ्याची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली. ज्या दोन संकल्पाची पूर्ती अद्याप झालेली नाही त्यामध्ये बसथांब्यालगत उपाहारगृहाची निर्मिती करणे, त्यासाठी बेरोजगार युवकांना काळजीवाहक म्हणून नेमणे आणि बसथांब्याची स्वच्छता, निगा व सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे आणि सार्वजनिक व खासगी सहभागातून टर्मिनल विकसित करणे याचा समावेश आहे.

१३,८८८ तक्रारींचा निपटारा
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी समितीतर्फे ०७१२-२२७७९०९९ हा टोल फ्री व ७५००००४६५ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला होता. टोल फ्री क्रमांकावर १४४७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १३,८८८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. व्हॉटस्अ‍ॅपवर एकूण ७७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६८६ चा निपटारा करण्यात आला.

Web Title: 244.82 crores budget for Nagpur Municipal Transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.