नागपुरात दोन विमानाने आले २४७ प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:02 IST2020-05-26T21:01:24+5:302020-05-26T21:02:47+5:30
मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांनी २४७ प्रवासी नागपुरात आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले.

नागपुरात दोन विमानाने आले २४७ प्रवासी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांनी २४७ प्रवासी नागपुरात आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले.
इंडिगोचे पहिले विमान मुंबईहून सकाळी १०.४० वाजता आणि दुसरे दिल्लीहून सकाळी ११.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या दोन्ही विमानातून एकूण २४७ प्रवासी नागपुरात आले तर याच विमानाने ११३ प्रवासी मुंबई आणि दिल्लीला गेले. विमानाने नागपुरात आलेल्या प्रवाशांकडून मुंबई आणि दिल्ली येथे तर नागपुरातून गेलेल्यांचे नागपूर विमानतळावर प्रतिज्ञापत्र भरून घेतले. याशिवाय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थर्मल स्कॅनिंग केले. सर्व प्रवाशांमध्ये कोविड-१९ ची कोणतीही लक्षणे आढळली नाही, असे सूत्रांनी सांगितले.