बुटीबोरीत महाआरोग्य तपासणी शिबिर २४ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 08:53 PM2018-03-17T20:53:11+5:302018-03-17T20:54:28+5:30
समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अॅन्ड वेल्फेअर सेंटर ६, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत व जैन सहेली मंडळ, नागपूरद्वारा आयोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने होणारे हे शिबिर सर्वांसाठी नि:शुल्क आहे.
जैन सहेली मंडळातर्फे समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी वर्षभर सातत्याने निरनिराळ्या विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी जैन सहेली मंडळातर्फे निरनिराळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात. महिला व बालकांच्या सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून या भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात शासकीय दंत रुग्णालयाची चमू दंत विकाराची तपासणी करतील. यासाठी विशेष ‘डेंटल व्हॅन’ उपलब्ध असणार आहे. मेडिकल रुग्णालयाकडून नेत्र तपासणी, चष्म्याचे नंबर काढण्यापासून ते डोळ्यांचे आजार, हाडांचे आजार, बालकांचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महिलांचे आजार, त्वचेचे आजार, श्वसन व दम्याचे आजार, ग्रंथीचे विकार आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासले जातील. शिबिरात विविध कर्करोग, सामान्य शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरीचे तज्ज्ञ सहभागी होणार असल्याने या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाईल.
हे शिबिर सर्वांसाठी खुले असून रुग्णांची नोंदणी शिबिराच्या ठिकाणीच दुपारी २ वाजेपर्यंत होईल. बुटीबोरी व आजूबाजूच्या गावातील महिला, पुरुष यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत व जैन सहेली मंडळातर्फे करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, रामदासपेठ येथे किंवा ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२ यावर संपर्क साधावा.