नागरी सुविधासाठी २५ कोटी
By admin | Published: July 19, 2015 03:10 AM2015-07-19T03:10:59+5:302015-07-19T03:10:59+5:30
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागपूर : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकास योजनांना गती मिळणार आहे.
जिल्हा वाषिंक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी १० कोटी तर जनसुविधासाठी विशेष अनुदान म्हणून १५ कोटी मंजूर करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध केला जातो. यातून पर्यावरण संतुलन ठेवून गावांचा सर्वंकष विकास योजना राबविण्याला मदत होणार आहे.
पाच हजारोपक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या व समृद्ध योजनेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीला विकास कामासाठी ५० लाखापर्यंत लाभ देता येतो. पाच वर्षांच्या प्रकल्प काळात दोन कोटींचा लाभ देता येतो. यात ग्रामपंचायतीचा १० टक्के स्वनिधी खर्च करावयाचा असून, ९० टक्के शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. मागील वर्षात पात्र असूनही लाभ न मिळालेल्या ग्रामपंचायतींचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.
यातून गावाचा नियोजनबद्ध विकास शक्य होणार आहे. यात बाजारपेठ, दिवाबत्ती, उद्यान, अभ्यास केंद्र, गावातील रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन व साकव बांधकाम आदी विकास कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)