कोराडी देवी मंदिरातील २५ कर्मचाऱ्यांना उपवासाच्या फराळातून विषबाधा
By जितेंद्र ढवळे | Published: April 11, 2024 09:41 PM2024-04-11T21:41:21+5:302024-04-11T21:41:34+5:30
- शिंगाडा व राजगिऱ्याच्या पीठाच्या खाल्ल्या पुऱ्या
नागपूर: कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे काम करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना उपवासाच्या फराळातून गुरुवारी विषबाधा झाली. सर्व रुग्णांना गणेश नगरी, कोराडी येथील नंदिनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी चार ते पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आल्याची माहिती नंदिनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजय सिंग यांनी दिली.
चैत्र नवरात्रोत्सव सुरू असल्याने मंदिरात काम करणारे पुजारी, अधिकारी व कर्मचारी यांना संस्थानच्या वतीने सकाळी उपवासाचे फराळ तर सायंकाळी जेवण दिले जाते. संस्थानच्या स्वयंपाक प्रसादालयातून ही जेवणाची व्यवस्था केली जाते. इतर भाविकांच्या जेवणाची व्यवस्था ही अन्नछत्रामधून केली जाते.
गुरुवारी सकाळी उपवासाचे फराळ म्हणून संस्थानच्या स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिंगाड्याचे व राजगिऱ्याचे पीठ मिसळून त्याच्या पुऱ्या तयार केल्या तर बटाट्याचे भरीत तयार करण्यात आले. पुजारी, व्यवस्थापक इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी १२ नंतर फराळ घेतला. दोन-तीन तासाने अनेकांना मळमळ व चक्कर यायला लागले. मंदिर प्रशासनाच्या वतीने या सर्वांना तत्काळ येथील नंदिनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वयंपाक्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून हे फराळ बनवण्यात आले होते. साहित्य पुरवण्याची जबाबदारी एका विश्वस्ताकडे सोपविण्यात आली आहे. नागपूरवरून या साहित्याचा पुरवठा केला जातो. पोलिसांनी या सर्वांचे बयाण नोंदविले आहेत.
फराळाच्या साहित्याची तपासणी करणार
यासंदर्भात संस्थानचे सचिव दत्तू समरीतकर यांनी या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, तसेच फराळामध्ये वापरण्यात आलेले साहित्य तपासले जाईल. अन्न व औषध प्रशासनाकडून या सर्व बाबीची चौकशी केल्या जाईल. प्राथमिक अंदाजानुसार शिंगाड्याच्या पिठातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. परंतु याबाबत संबंधितांकडून तपासणी अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल.
सर्व रुग्णांना सारखीच लक्षणे असून फूड पॉयझनिंगचा प्रकार आहे. सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तीन ते चार लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.-डॉ. अजय सिंग, संचालक, नंदिनी हॉस्पिटल, कोराडी