चक्क रा.स्व. संघाच्या लेटरहेडचा वापर करून २५ लाखांनी केली व्यापाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 08:44 PM2022-06-02T20:44:51+5:302022-06-02T20:46:22+5:30

व्यवसायात गुंतवणूक करून भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने हुंडी दलाल जगदीश कारवा व त्याच्या कुटुंबीयांनी अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून, त्यांचे नवे प्रकरण समोर आले आहे.

25 lakh cheated trader using letterhead of RSS | चक्क रा.स्व. संघाच्या लेटरहेडचा वापर करून २५ लाखांनी केली व्यापाऱ्याची फसवणूक

चक्क रा.स्व. संघाच्या लेटरहेडचा वापर करून २५ लाखांनी केली व्यापाऱ्याची फसवणूक

Next
ठळक मुद्देकारवा कुटुंबाकडून आतापर्यंत अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा चुनाआरोपी जगदीश कारवा ताब्यात

नागपूर : व्यवसायात गुंतवणूक करून भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने हुंडी दलाल जगदीश कारवा व त्याच्या कुटुंबीयांनी अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून, त्यांचे नवे प्रकरण समोर आले आहे. त्यांनी आता वाठोड्यात राहणाऱ्या व्यापाऱ्याला २५ लाखांचा चुना लावला. यासंदर्भात वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कारवाला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कारवाने चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक व सीए राजेश लोया यांच्या लेटरपॅडचा वापर करीत व्यापाऱ्याची दिशाभूल केली. काही दिवसांअगोदर उद्योजक अशोक गोयल यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनीदेखील गुन्हा दाखल केला होता.

त्याची पत्नी संगीता कारवा, भाऊ हेमंत कारवा आणि राजेश कारवा, अशी आरोपींची नावे आहेत. जगदीश कारवा हुंडी दलाल म्हणून काम करतो. तो मोठ्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देत असे. त्याची काही वर्षांअगोदर शंकर अग्रवाल यांच्याशी ओळख झाली. कारवाने अग्रवाल यांना मोठमोठ्या थापा मारल्या. २५ लाख रुपये दिले तर तीन ते चार महिन्यांत तीन लाखांचा फायदा होईल, असा दावा कारवाने केला. दोन-तीन वेळा चर्चा झाल्यानंतर अग्रवाल यांना कारवाबाबत विश्वास बसला. त्यांनी नोव्हेंबर २०२० ते १ जून २०२२ या कालावधीत कारवाला २५ लाख रुपये दिले. कारवाने कोटक बँकेचा धनादेश व सीए राजेश विठ्ठलदास लोया यांचे लेटरपॅड बनावट सही करून अग्रवाल यांना सुपुर्द केले. यावरून अग्रवाल यांना आणखी विश्वास बसला.

मात्र, पैसे घेतल्यानंतर कारवाने अग्रवाल यांना टाळायला सुरुवात केली. दरम्यान, इतवारीच्या हुंडी दलालाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर अग्रवाल यांनी कारवाने दिलेला धनादेश आणि लेटरहेड तपासले असता धक्कादायक खुलासा समोर आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अग्रवाल यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी जगदीश कारवासह चौघांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला व कारवाला अटक केली.

बऱ्याच व्यापाऱ्यांची फसवणूक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतवारी आणि पूर्व नागपुरातील अनेक बड्या व्यावसायिकांनी कारवाजवळ कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बहुतांश लोकांनी रोख रक्कम दिली आहे. यामुळे ते तक्रार देण्यासही टाळाटाळ करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर अनेक प्रकरणे समोर येऊ शकतात.

अनेक फर्मचे बनावट लेटरपॅड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांच्या फर्मचे बनावट लेटरपॅड कारवाने अग्रवाल यांना दिले होते. लोया यांना याबाबत कुठलीही कल्पना नव्हती. कारवाकडे लेटरपॅड कसे आले की त्याने बनावट लेटरपॅड छापले याचादेखील शोध घेण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारवा याचा छापखानादेखील असून, त्याने अनेक फर्मच्या नावाने बनावट लेटरपॅड छापलेले आहेत.

Web Title: 25 lakh cheated trader using letterhead of RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.