फेटरीत २५ लाखांची वीज चोरी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:03+5:302021-07-14T04:10:03+5:30
कळमेश्वर : फेटरी परिसरात थेट आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या स्टोन क्रशर मालकाची वीज चोरी महावितरणच्या भरारी पथकाने पकडली. ...
कळमेश्वर : फेटरी परिसरात थेट आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या स्टोन क्रशर मालकाची वीज चोरी महावितरणच्या भरारी पथकाने पकडली. याप्रकरणी क्रशर मालकाला दंडासह २५ लाखांचे देयक देण्यात आले. स्टोन क्रशर मालक गत वर्षभरापासून आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.
महावितरणच्या पथकास फेटरी परिसरात स्टोन क्रशर चालकांकडून आकडे टाकून वीज चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावर महावितरणच्या भरारी पथकाने धाड टाकून आकडे टाकून सुरू असलेली वीज चोरी रंगेहाथ पकडली.
वीज चोरी पडल्यावर पंचनामा केला असता स्टोन क्रशर मालकाने वर्षभराच्या कालावधीत १,१२,०३५ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. याचे मूल्याकंन केले असता १४ लाख ७८ हजार ९१२ रुपये आणि तडजोड शुल्क १० लाख रुपये असे एकूण २५ लाख ७८ हजार ९१२ रुपयांचे देयक भरारी पथकाने स्टोन क्रशर मालकास दिले. स्टोन क्रशर मालकाने महावितरणकडून देण्यात आलेल्या देयकाची रक्कम तात्काळ अदा करीत कायदेशीर कारवाई टाळली. महावितरणच्या भरारी पथकाचे नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुमितकुमार, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास नवघरे, दक्षता आणि सुरक्ष विभागाचे विश्वनाथ बिसने, एकता पारधी यांनी ही चोरी पकडली.