मेयो इस्पितळाला वीज बचतीसाठी २५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:30 PM2017-12-05T13:30:44+5:302017-12-05T13:36:23+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विजेच्या बिलावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतो. हे बिल कमी करण्यासाठी व वीज बचतीचे धोरण राबविण्याच्या हेतून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मेयो प्रशासनाला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विजेच्या बिलावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतो. हे बिल कमी करण्यासाठी व वीज बचतीचे धोरण राबविण्याच्या हेतून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मेयो प्रशासनाला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री यांनी वीज बचतीच्या धोरणांवर चर्चा केली. ते म्हणाले, मेयोच्या विजेवर वर्षाचे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतात. हा खर्च निम्म्यावर आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवे. वीज बचत धोरणाची सुरुवात विद्युत दिवे व जुन्या पंख्यांपासून करा. सर्व विद्युत दिव्यांच्या जागी एलईडी दिवे लावा. जुने पंखे काढून त्या जागी ‘फाईव्ह स्टार रेटींग’चे पंखे बसून घ्या. वातानुकूलित व इतरही कुठले उपकरण खरेदीच्यावेळी वीज बचतीची धोरण लक्षात ठेवा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
‘सोलर’साठी प्रस्ताव तयार करा
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, रुग्णालयाचा मोठा पैसा विजेवर खर्च होत आहे. तो कमी करण्यासाठी ‘सोलर एनर्जी’ बसविण्याचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
लाँड्री, किचनचे आऊट सोर्सिंग
नवीन‘लाँडी प्लांट’ सुरू करण्यापेक्षा त्याचे आऊट सोर्सिंग करा. तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, रुग्णांना जेवण पुरविण्यासाठीही आऊट सोर्सिंग केले जाऊ शकते. यावरही चर्चा करून निर्णय घेण्याचे त्यांनी सुचविले.
न्यायवैद्यकशास्त्राच्या इमारतीसाठी ५ कोटी ९० लाख
न्यायवैद्यकशास्त्राच्या नव्या इमारतीसाठी ५ कोटी ९० लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. त्याला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न आहे, अशी माहिती देत पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, ‘इन्स्टिट्यूट आॅफ चाईल्ड हेल्थ’च्या मंजुरीसाठी, सीएसआर निधीतूून मिळणाऱ्या १ कोटी ३० लाख रुपयांमधून प्रतीक्षालयासाठी, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी असलेल्या एक मजलीच्या इमारतीवर सात मजले चढविण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहे.
३८ नव्या पदांसाठी प्रयत्न
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ दरवर्षी मेयोतील अल्प मनुष्यबळाच्या त्रुटीवर बोट ठेवते. यावर उपाय म्हणून लवकरच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवांशी बैठक घेऊन नवीन ३८ पदे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यात दोन सहयोगी प्राध्यापक, सहा सहायक प्राध्यापक व ३० ट्युटर्सचा समावेश असेल. सोबतच ७० परिचारिकांच्या जागा भरण्यावरही त्यांनी भर दिला.