ट्रॅक्टरने दिले २५ लाख, तर कंटेनरमधून मिळाले साडेअठरा कोटी; रेल्वेच्या वाहतुक विभागाची चांदी
By नरेश डोंगरे | Published: September 10, 2023 02:11 PM2023-09-10T14:11:01+5:302023-09-10T14:11:51+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑगस्ट महिन्यात माल वाहतूकीतून प्राप्त केलेल्या उत्पन्नाची आकडेवारी उघड केली आहे.
नागपूर : शेतकरी मित्र अन् शेतीचा अभिन्न भाग मानला जाणाऱ्या ट्रॅक्टरने रेल्वेला गेल्या महिन्यात चक्क २५ लाख रुपये दिले आहे. होय, ट्रॅक्टरच्या वाहतुकीतून रेल्वेला २५ लाख तर कंटेनर वाहतूकीतून रेल्वे प्रशासनाच्या नागपूर विभागाला चक्क १८ कोटी, ४६ लाखांचा महसुल मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑगस्ट महिन्यात माल वाहतूकीतून प्राप्त केलेल्या उत्पन्नाची आकडेवारी उघड केली आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. पुर्वी शेतीच्या कामासाठी फार कमी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करायचे. बैलगाडीवरच शेतीची भिस्त होती. आता मात्र मशागतीसह शेतीचे दुसरे काम, शेतमालाच्या साहित्याची, उत्पादनाची ने-आण तसेच अन्य मालाच्या वाहतुकीसाठीही ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वापर होतो.
त्यामुळे ट्रॅक्टरची विक्रीही वाढली आहे. हे ट्रॅक्टर जागोजागी पोहचवण्याची जबाबदारी रेल्वेचा मालवाहतुक विभाग करतो. लांब अंतरावर ट्रॅक्टर पोहचविण्यासाठी रेल्वेकडून फारच माफक शुल्क घेतले जाते. त्यामुळे येथून तेथे लांब अंतरावर ट्रॅक्टर चालवित नेण्यापेक्षा कंपन्या आपल्या वितरकापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून ट्रॅक्टर पाठवितात.
गेल्या ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अशा प्रकारे ट्रॅक्टरची वाहतूक करून अवघ्या एका महिन्यात २५ लाख रुपये कमविले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी या महिन्यात रेल्वेकडून ट्रॅक्टर वाहतूक करण्यात न आल्याने एकही रुपया मिळाला नव्हता.
अशाच प्रकारे १२१ कंटेनरच्या रॅकची वाहतूक करून रेल्वेने अवघ्या महिनाभरात १८ कोटी ४६ लाख रुपये कमविले आहे.
राखेतून काढले सव्वा कोटी
रेल्वेने नागपूर विभागातून ऑगस्ट २०२३ मध्ये फ्लाय अॅश (राखेची) वाहतूक केली. त्यातून चक्क १ कोटी, २४ लाखांची कमाई केली आहे.