नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 10:52 AM2023-10-04T10:52:06+5:302023-10-04T10:57:42+5:30

नागपूर येथील मेयो-मेडिकलमध्ये विदर्भासह शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा राज्यातील अत्यावस्थ अवस्थेतील रुग्णांना उपचारासाठी आणले जाते.

25 patients died in 24 hours at Mayo-Medical government Hospital in Nagpur | नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

googlenewsNext

नागपूर : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच नागपुरातही मेयो-मेडिकल या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नागपूर येथील मेयो-मेडिकलमध्ये विदर्भासह शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा राज्यातील अत्यावस्थ अवस्थेतील रुग्णांना उपचारासाठी आणले जाते. या रुग्णांसाठी मेडिकलला अधिकृत १ हजार ४०१ तर ट्रॉमा आणि अतिरिक्त मिळून एकूण १ हजार ८०० खाटा आहेत. तर मेयोत ८३० खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज दीड हजारावर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. तर, खासगी रुग्णालय आपल्या मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवटच्या क्षणाला अत्यवस्थ अवस्थेतील व्हेंटिलेटरवरच्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. 

दरम्यान, २ ऑक्टोबरला मेडिकलमध्ये २४ तासांत १६ आणि मेयो रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. मेडिकलमध्ये दगावलेल्या रुग्णांपैकी ८ रुग्णांना खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत येथे हलविण्यात आले होते. या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात ठेवले. परंतु २४ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही हीच स्थिती होती. यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. 

- औषधी खरेदी अनुदानात वाढही नाही

मेडिकलमध्ये असलेल्या २ हजार २०० बेडनुसार, शासन औषधी व सर्जिकल साहित्यासह इतर ११ सामग्री खरेदी करण्यासाठी दरवर्षी ९ कोटी ९९ लाख रुपये अनुदान देते. दरवर्षी यांच्या किमतीत वाढ होत असल्याने अनुदानात सहा ते दहा टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु, मागील पाच वर्षांपासून अनुदानात वाढच झाली नाही. अशीच स्थिती मेयोची आहे.

Web Title: 25 patients died in 24 hours at Mayo-Medical government Hospital in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.