नागपूर-मुंबई विमान तिकिटांचे २५ हजारी उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:56 IST2024-12-05T16:52:28+5:302024-12-05T16:56:04+5:30
शपथविधीला पोहोचण्यासाठी अनेकांना तिकीटच मिळाले नाही : समृद्धी महामार्गाने शेकडो समर्थक रवाना

25 thousand Nagpur-Mumbai flight tickets
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेकांनी विमानाने मुंबईवारीचा बेत आखला. मात्र, बुधवारी सायंकाळच्या नागपूर-मुंबई विमानाचे तिकीटदर तब्बल २० हजारांवर, तर गुरुवार सकाळच्या विमानाचे तिकीट दर २५ हजारावर पोहोचले. त्यामुळे शेकडो शुभचिंतक बुधवारी सायंकाळनंतर आपल्या चारचाकी वाहनांनी समृद्धी महामार्गाने मुंबईसाठी रवाना झाले.
फडणवीस मुख्यमंत्री होणार ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग नागपूरसह विदर्भात आहे. त्यामुळे त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी अनेकांनी मुंबईवारीचा बेत आखला. अनेकांनी गुरुवारी सकाळी विमानाने रवाना होण्याचे नियोजन केले. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत गुरुवार सकाळच्या नागपूर-मुंबई विमानाच्या तिकीट दरांनी २० हजार रुपयांचा पल्ला ओलांडला.
इंडिगोचे (जीई ५००२) सकाळी ६:०५ वाजता मुंबईला जाणाऱ्या विमानाचे तिकीट १७ हजार ६६९ रुपयांवर होते, तर इंडिगोच्या सकाळी ८:२५ वाजताच्या विमानाचे तिकीट तब्बल २० हजार ७२० रुपयांवर पोहोचले होते. एअर इंडियाच्या (एआय ६२८) विमानाचे तिकीट सायंकाळी ६ वाजता १६ हजार १६० रुपयांना होते. मात्र, सायंकाळी ७.१५ वाजता हे दर वाढून तब्बल २५ हजार ३४९ रुपयांवर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत तिकीट दरात हजार- दोन हजार रुपयांचा चढउतार सुरू होता. मात्र, तिकीट दर फारसे कमी झाले नाही. विमान तिकिटांचे वाढलेले दर पाहून अनेकांनी समृद्धी महामार्गाने मुंबई गाठणे पसंत केले. बुधवारी सायंकाळनंतर शेकडो चारचाकी वाहने समृद्धी मार्गाने मुंबईसाठी रवाना झाली.
ट्रॅव्हल एजन्सींनीही हात वर केले
विमान तिकिटांचे वाढलेले दर पाहून अनेकांनी ट्रॅव्हल एजन्सींशी संपर्क साधला; पण त्यांनीही हात वर केले. नागपूरहून मुंबईला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे विमान कंपन्यांकडूनच दर वाढविण्यात आले आहेत, असे ट्रॅव्हल एजन्सींकडून सांगण्यात आले.
बुधवारी रात्रीचे तिकीटही २० हजारांवर
बुधवारी रात्रीच्या एअर इंडिया व इंडिगो या दोन्ही विमानांचे नागपूर-मुंबई तिकीट २० हजारांवर पोहोचले होते. महागड्या तिकिटांमुळे शपथविधीच्या पूर्वसंध्येला विमानाने मुंबई गाठण्याचा अनेकांचा बेत हुकला.