नागपूर जिल्ह्यात रक्कम मोजून देण्याच्या नावावर २५ हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:40 AM2018-01-18T11:40:26+5:302018-01-18T11:40:45+5:30
बँकेतून उचल केलेली रक्कम मोजून देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने हातचलाखीने बँक खातेदाराकडील २५ हजार ५०० रुपये लंपास करून त्याची फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेतून उचल केलेली रक्कम मोजून देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने हातचलाखीने बँक खातेदाराकडील २५ हजार ५०० रुपये लंपास करून त्याची फसवणूक केली. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या वडोदा (ता. कामठी) येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
दिनकर लक्ष्मण खेडकर (४५, रा. भूगाव, ता. कामठी) यांचे वडोदा (ता. कामठी) येथील पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते आहे. त्यांनी शुक्रवारी (दि. १२) दुपारी बँकेतून एक लाख रुपयांची उचल केली. कॅशियरने त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे नोटांचे दोन बंडल दिले. त्यामुळे ते कॅश काऊंटरच्या शेजारी असलेल्या टेबलजवळ नोटा मोजत उभे होते.
त्यातच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि बंडलमधील नोटा नकली असल्याची बतावण केली. शिवाय, नोटा आपल्याला दाखविण्याची सूचनाही केली. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत दिनकर खेडकर यांनी त्यांच्याकडील ५० हजार रुपयांचे बंडल नोटा मोजण्यासाठी त्या व्यक्तीला दिले. त्याने नोटा मोजून ते खेडकर यांना परत केले आणि बँकेतून निघून गेला. खेडकर यांनी नोटांचे ते बंडल पुन्हा मोजल्या असता त्यात २४ हजार ५०० रुपये किमतीच्याच नोटा होत्या. त्या व्यक्तीने बंडलमधील २५ हजार ५०० रुपये काढून पळ काढला होता.
या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिनकर खेडकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनीही बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.