Nagpur | २५ महिला शौचालये कुलूपबंदच; महिलांच्या प्रश्नाविषयी मनपा उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 03:55 PM2022-07-04T15:55:31+5:302022-07-04T16:14:52+5:30
महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेविका आहेत, अडीच वर्षांपूर्वी एक महिला महापौरही राहिली आहे. परंतु त्या महिलांच्या ज्वलंत प्रश्नांविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
नागपूर : उपराजधानीचे शहर व आता स्मार्ट सिटी म्हणून मिरविणाऱ्या नागपुरात प्रसाधनगृहाअभावी महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच रोटरी क्लबने बांधलेले २५ प्रसाधनगृह मनपाने दोन वर्षांपासून कुलूपबंद केले आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेविका आहेत, अडीच वर्षांपूर्वी एक महिला महापौरही राहिली आहे. परंतु त्या महिलांच्या ज्वलंत प्रश्नांविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात दररोज लाखो महिला नोकरी, खरेदीसह विविध कामांसाठी घराबाहेर पडतात. त्यांसाठी शहरात पुरेशा सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. परंतु शहरात १०२ सार्वजनिक शौचालये असून यात केवळ ७७३ सिट्स आहे. यात पुरुषांसाठी ४८८ तर महिलांसाठी २८५ सिट्स आहे. ३० लाख लोकसंख्येच्या शहरात ५० टक्क्यांपर्यंत महिला आहे. महिलांबाबत विचार केल्यास १५ लाखांच्या संख्येमागे केवळ २८५ सिट्स आहे. अनेक प्रसाधनगृहे सहज दृष्टीस पडेल अशा ठिकाणी नाही. शहरातील अनेक भागात महिलेसाठी एकही प्रसाधनगृह नाही. अनेक महिला नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. त्यांना केवळ कार्यालयाचाच आधार असतो.
- महिलांना किडनीच्या आजाराचा धोका
नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते दरवर्षी किडनीच्या आजाराने लाखो नागरिक ग्रस्त होतात. यात महिलांचे प्रमाण मोठे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत महिलांसाठी प्रसाधनगृह नसणे हे महत्त्वाचे कारण आहे.
ही अडचण लक्षात घेऊन रोटरीने शहरात महिलांसाठी ५० प्रसाधनगृह बांधण्याचा संकल्प केला. त्यानुसार शहरातील विविध भागात महिलांसाठी २५ प्रसाधनगृह बांधले. काही वर्ष त्यांनी शौचालयाची देखभाल केली. त्यानंतर मनपाकडे हस्तांतरित केले. पण मनपा देखभाल करू न शकल्याने हे प्रसाधनगृहे कुलूपबंद आहे. आता रोटरीचेदेखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.
- टॉयलेट बसचा प्रयोग फसला
वर्दळी भागात, आठवडी बाजारात महिलांसाठी शौचालयासाठी अडचणी जातात. महिलांसाठी शौचालये उपलब्ध व्हावी, यादृष्टीने परिवहन विभागाच्या जुन्या भंगार पडलेल्या बसेसचा योग्य पुनर्वापर करून महिलांसाठी टॉयलेट बस निर्माण करण्यात येणार होते. प्रारंभीच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात येणार होत्या, परंतु हा प्रयोगही फसला.