२५ आपली बस रुग्णवाहिका म्हणुन सेवा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:08+5:302021-04-25T04:07:08+5:30
शववाहिका व रुग्णवाहिकेसाठी भटकंती करणाऱ्यांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण प्रचंड वाढल्याने शहरातील हॉस्टिलमध्ये बेड शिल्लक ...
शववाहिका व रुग्णवाहिकेसाठी भटकंती करणाऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण प्रचंड वाढल्याने शहरातील हॉस्टिलमध्ये बेड शिल्लक नाही. शहरात ८९४ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत, परंतु दररोज ४ ते ५ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असल्याने, रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णवाहिकांसाठी धावाधाव करावी लागत आहे. याचा विचार करता, महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २५ आपली बस रुग्णवाहिका म्हणून सेवा देणार आहेत. यामुळे काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
शहरातील गरजू रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने, परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी बसमध्ये ऑक्सिजन व अन्य आवश्यक सुविधा निर्माण कराव्या लागतील. शहरात ६५ हजारांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णांच्या नातेवाइकांना अडचणीचा सामना करावा लागतो.
याचा विचार करता, महापालिकेच्या दहा झोनला प्रत्येकी दोन बस उपलब्ध केल्या जातील. या बसचे नियंत्रण झोन स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांकडे राहील. गृहविलगीकरणातील रुग्णांना डेडिकेट कोविड केअर सेंटरवर पोहोचविणे, रुग्णालयात दाखल करणे, यासाठी या बसचा वापर केला जाईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट महिन्यात सहा आपली बसचा रुग्णवाहिका म्हणून वापर करण्यात आला होता. यासाठी या बसमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या.
४६० आपली बस आहेत. दररोज १ लाख ५० हजार प्रवासी यातून प्रवास करतात, परंतु कोरोना संक्रमणामुळे यातील फक्त ९० बस प्रवासी वाहतूक करीत आहेत. २८ बस कोविड १९ संबंधित कामासाठी वापरल्या जात असल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
...
१६ बसची शववाहिका म्हणून सेवा
कोरोनामुळे दररोज ६० ते ७० लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत मृतकांच्या नातेवाइकांना मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेता यावा, याचा विचार करता १६ आपली बस शववाहिका म्हणून सेवा देत आहेत.
....
१०८ क्रमांकावरही लगेच रुग्णवाहिका मिळत नाही
मागील काही दिवसांत शहरात दररोज ४ ते ५ हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहे. तातडीच्या मदतीसाठी १०८ क्रमांवर रुग्णवाहिका उपलब्ध होते. अशा ११ रुग्णवाहिका आहेत, परंतु रुग्ण वाढल्याने या रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत.