२५० खाटांचे होणार नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:00 PM2019-06-18T22:00:01+5:302019-06-18T22:02:52+5:30
कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचा विकास रखडल्याने शेवटची घरघर लागली आहे. तब्बल १४ वर्षे होऊनही हे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. मात्र आता, या रुग्णालयाच्या विकासासाठी मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकताच २५० खाटांचा प्रस्ताव ‘डीएमईआर’कडे पाठविला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पूर्व, उत्तर नागपूरसह, ग्रामीण व सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णांना रुग्णालयाचा फायदा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचा विकास रखडल्याने शेवटची घरघर लागली आहे. तब्बल १४ वर्षे होऊनही हे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. मात्र आता, या रुग्णालयाच्या विकासासाठी मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकताच २५० खाटांचा प्रस्ताव ‘डीएमईआर’कडे पाठविला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पूर्व, उत्तर नागपूरसह, ग्रामीण व सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णांना रुग्णालयाचा फायदा होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) देखरेखीखाली १५ ऑगस्ट २००५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या कारभाराला सुरुवात झाली. रुग्णालयाच्या स्थापनेला १४ वर्षे होऊनही हा विभाग बाह्यरुग्ण विभागाच्या औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी) अस्थिव्यंगोपचारशास्त्र (आर्थाेपेडिक) स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र, पॅथालॉजी व रेडिओलॉजी अशा आठ विभागातच अडकून पडला. यातील बालरोग, नेत्ररोग, पॅथालॉजी व स्त्रीरोग व प्रसुती विभागाचे डॉक्टर हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहेत तर उर्वरित विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर हे कंत्राटी आहेत. यातच अपुरे मनुष्यबळ, सोईंचा अभाव यामुळे या रुग्णालयात येणाऱ्यांना मेयो गाठावेच लागते. या रुग्णालयाच्या विकासाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रेंगाळत चालला होता. अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी या रुग्णालयाच्या विकासासाठी पुढाकार घेत नव्याने २५० खाटांचा प्रस्ताव तयार केला. सूत्रानूसार, हा प्रस्ताव ‘डीएमईआर’कडून मंत्रालयात गेला असून लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनीही या रुग्णालयाची पाहणी केली होती. मंगळवारी रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी रुग्णालयाची पाहणी केली.
नव्या रुग्णालयात असणार आयसीसीयू युनिट
२५० खाटांच्या डॉ. आंबेडकर आंतर रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभाग, शल्यचिकित्साशास्त्र विभाग, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग, बालरोग विभाग, त्वचारोग व गुप्तरोग विभाग, मानसिक रोग विभाग, नेत्ररोग विभाग या सात विभागातून सेवा दिली जाणार आहे. ३० खाटांचा एक-एक वॉर्ड प्रत्येकी विभागात असणार आहे. सोबतच ‘आयसीसीयू युनिट’ असेल. यात आयसीयू, एनआयसीयू व पीआयसीयू असणार आहे. सोबतच कॅन्सर रुग्ण, सिकलसेल व थॅलसेमियाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.
८९ पदे प्रस्तावित
नव्या प्रस्तावात प्राध्यापकांची सात पदे, सहयोगी प्राध्यापकांची आठ पदे, सहायक प्राध्यापकांची २१ पदे तर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५४ पदे अशी एकूण ८९ पदे प्रस्तावित आहे.
२५० खाटांच्या आंतर रुग्णालयाची गरज
उत्तर नागपुरात २५० खाटांच्या आंतर रुग्णालयाची गरज आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांसोबतच मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यांना होऊ शकेल. या रुग्णालयाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
डॉ. अजय केवलिया
अधिष्ठाता, मेयो