दीक्षाभूमीच्या विकासासाठी २५० कोटींचा आराखडा
By admin | Published: March 14, 2016 03:09 AM2016-03-14T03:09:41+5:302016-03-14T03:09:41+5:30
नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी २५० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस : उत्तर नागपुरात ४० कोटींचे सिमेंट रस्ते, सिकलसेल सेंटरसाठी ७ एकर जागा
नागपूर : नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी २५० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. जगातील विविध देशातून नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना प्रथम दीक्षाभूमीला भेट देण्याची इच्छा व्हावी अशा आकर्षक दृष्टीने विकास करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उत्तर नागपुरात ४० कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर सिंधी हिंदी शाळेच्या मैदानात आयोजित समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी तर अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके हे होते. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आमदार अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, मनपाचे सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपुरात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबतच्या धोरणात काही सुधारणा करण्यात येईल. त्यांना घरबांधणीसाठी शासनातर्फे अनुदानही देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सिकलसेलग्रस्तांवर उपचार व संशोधन करण्यासाठी उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय संशोधन केंद्राला लागून असलेली सात एकर जागा सिकलसेल युनिट सेंटर आॅफ एक्सलन्ससाठी देण्यात येत आहे. हे केंद्र कसे असावे याचा प्रारूप आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधिताना दिले. उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. संचालन नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केले.(प्रतिनिधी)