२५० वकील डिफॉल्टर घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:13 AM2021-02-17T04:13:39+5:302021-02-17T04:13:39+5:30
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या पाचसदस्यीय निवडणूक समितीने सुमारे २५० सदस्य वकिलांना डिफॉल्टर घोषित करून त्यांचा मतदानाचा अधिकार ...
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या पाचसदस्यीय निवडणूक समितीने सुमारे २५० सदस्य वकिलांना डिफॉल्टर घोषित करून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे. मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यात १८४७ वकिलांचा समावेश आहे. संघटनेच्या निवडणुकीत केवळ त्यांनाच मतदान करता येणार आहे.
३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा केले नाही, अशा वकिलांना निवडणूक समितीने डिफॉल्टर घोषित केले आहे. निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार, ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा करण्याची सूचना निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आली होती. असे असताना सुमारे २५० वकिलांनी या सूचनेचे पालन केले नाही. याशिवाय २० जानेवारी २०२० व त्यानंतर संघटनेचे सदस्यत्व मिळालेल्या वकिलांना निवडणुकीत मतदान करता येणार नाही. अशा वकिलांची संख्या सुमारे १५० आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र जारी केले जाणार आहेत. निवडणूक समितीमध्ये ॲड. प्रकाश मेघे, ॲड. भानुदास कुलकर्णी, ॲड. अरुण पाटील, ॲड. संग्राम सिरपूरकर व ॲड. फिरदोस मिर्झा यांचा समावेश आहे.