२५० वैद्यकीय शिक्षक पदावनत : मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 08:07 PM2018-07-21T20:07:44+5:302018-07-21T20:12:49+5:30
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कार्यरत वैद्यकीय शिक्षकांना कालबद्ध पदोन्नती न देता तदर्थ (तात्पुरत्या) पदोन्नतीचे धोरण राबविले. परंतु आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) ही तात्पुरती पदोन्नती समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे २०० ते २५० वर वैद्यकीय शिक्षकांवर पदावनत होण्याची वेळ आली आहे. ‘डीएमईआर’च्या या कारभाराबाबत डॉक्टरांमध्ये असंतोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कार्यरत वैद्यकीय शिक्षकांना कालबद्ध पदोन्नती न देता तदर्थ (तात्पुरत्या) पदोन्नतीचे धोरण राबविले. परंतु आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) ही तात्पुरती पदोन्नती समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे २०० ते २५० वर वैद्यकीय शिक्षकांवर पदावनत होण्याची वेळ आली आहे. ‘डीएमईआर’च्या या कारभाराबाबत डॉक्टरांमध्ये असंतोष आहे.
पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी व ज्या मेडिकल कॉलेजमध्ये ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या निकषानुसार वैद्यकीय शिक्षक नाही त्या जागा दाखविण्यासाठी ‘डीएमईआर’ने २० जुलै २०१७ रोजी सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांना तदर्थ पदोन्नती दिली. राज्यात २०० ते २५० वैद्यकीय शिक्षकांना याचा लाभ मिळाला. मात्र, ही पदोन्नती ३६० दिवसांची होती. याची मुदत १९ जुलै २०१८ रोजी संपली. ‘डीएमईआर’ने याला मुदत वाढ न देता ही पद्धतच समाप्त करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत झालेल्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक तर सहयोगी प्राध्यापकांना सहायक प्राध्यापक आपल्या मूळ पदावर आले. ज्येष्ठता सूचीला डावलून नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती दिल्यामुळे अखेर या वैद्यकीय शिक्षकांवर पदावनत होण्याची वेळ आली आहे. शोधनिबंध सादर न करणाऱ्या डॉक्टरांची पदोन्नती रद्द करण्यात येईल, असेही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने स्पष्ट केले होते. मात्र मर्जीतील डॉक्टरांनी शोधनिबंध सादर न करताही त्यांची पदोन्नती कायम ठेवली असल्याची माहिती आहे.
‘डीएमईआर’च्या कारभारामुळे वैद्यकीय शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. सूत्रानूसार, लवकर याबाबत नवीन निर्णय होण्याची शक्यता आहे. या शिक्षकांना आपल्या मूळ पदावर रुजू करून घेण्याचे आदेश अधिष्ठात्यांना असल्याने त्यांनी आपले काम बजावणे सुरू केले आहे.
तदर्थ पदोन्नतीवर लवकरच निर्णय
प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांना देण्यात आलेली तदर्थ पदोन्नती मागे घेण्यात आली आहे. याचा फटका २५० वर डॉक्टरांना बसला आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेच्यावतीने याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
डॉ. समीर गोलावार
अध्यक्ष, राज्य वैद्यकीय शिक्षण संघटना