शस्त्रक्रियेसाठी २५० रुग्णांची नोंदणी
By Admin | Published: May 24, 2016 02:38 AM2016-05-24T02:38:26+5:302016-05-24T02:38:26+5:30
भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने बी.आर.मुंडले सभागृहात आयोजित आरोग्य महाशिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
महाशिबिराला प्रचंड प्रतिसाद : तीन दिवसांत २५०० रुग्णांनी घेतला लाभ
नागपूर : भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने बी.आर.मुंडले सभागृहात आयोजित आरोग्य महाशिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत २५०० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्र्रियेसाठी २५० रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.
यात हृदय, कॅट्रॅक्ट, हायड्रोसिल, नी-रिप्लेसमेंट, हर्निया, प्लास्टिक सर्जरी व मूत्राशय असे आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे २७, २८ आणि २९ मे दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने गर्दी वाढली आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आता दररोज पहिल्या एक हजार रुग्णांची नोंदणी करून उपचार करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. सकाळी १० पासून दुपारी १ पर्यंत एक हजार रुग्णांची नोंदणी केली जाईल. नागरिकांनी दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य महाशिबिराचे संयोजक संदीप जोशी व सहसंयोजक प्रकाश भोयर यांनी केले आहे.
गेल्या तीन दिवसात अडीच हजार नागरिकांनी विविध आरोग्य विभागातील सेवेचा लाभ घेतला आहे. २६ मेपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शिबिराचा लाभ घेता येईल. तसेच याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी काऊंटर सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान सुरू ठेवण्यात आले आहे. दर्जेदार आरोग्य सेवा मिळवणे प्रत्येक रुग्णाचा हक्क आहे. मात्र खासगी रुग्णालयात खर्च अधिक होत असल्याने अनेकांना वेळेत उपचार मिळत नाही. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेगळ्या पद्धतीने समाजिक उपक्रम हाती घेण्याचा प्रयत्न भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने करण्यात येत असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.सोमवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी हजेरी लावली. तसेच याठिकाणी असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेत यशस्वी आयोजनासाठी संयोजक व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
२६ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शिबिराचा लाभ घेता येईल. तसेच याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी काऊंडर सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान सुरू ठेवण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी संदीप जोशी, प्रकाश भोयर, नगरसेवक अविनाश ठाकरे, महामंत्री आशिष पाठक, सचिन कारळकर, श्रीपाद बोरीकर, संपर्क प्रमुख सुरेंद्र पांडे, मुन्ना यादव, रमेश सिंगारे, गिरीश देशमुख, विजय राऊत, सुमित्रा जाधव, शरद बांते, संजय बोंडे, प्रकाश तोतवानी, नीलिमा बावणे, अश्विनी जिचकार, जयश्री वाडीभस्मे, पल्लवी शामकुळे, उषा निशीतकर, सरिता तिवारी, सरोज बहादुरे, सफलता आंबटकर, प्रा. राजीव हडप, विवेक तरासे, किशोर वानखेडे, गोपाल बोहरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत
शिबिरात नेत्ररोग तपासणी, अस्थिव्यंग्योपचार, सामान्य सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, जनरल मेडिसीन, दंतरोग, पॅथालॉजीसह सर्व आजारांच्या तपासण्या, उपचार करण्यात येत आहे.शासकीय दंत महाविद्यालयाचे फिरते रुग्णालयही याठिकाणी अद्ययावत साधनसामग्रीने सज्ज असल्यामुळे नागरिकांना लाभ मिळत आहे.(प्रतिनिधी)
मोफत औषध वितरण
शिबिरातील लाभार्थ्यांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे मोफत वितरण करण्यात येत आहे. यात साधारण औषधांपासून तर स्त्रीरोग, हिमोग्लोबिन औषध महिन्याभरापर्यंत रुग्णांना देण्यात येत असल्याचे औषध वितरण विभागातील शैलेश अग्रवाल यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा हा आपला एकमात्र उद्देश असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.