२५०० वर रेमडेसिवीर एक्सपायरीच्या उंबरठ्यावर; कोरोनाचे रुग्ण घटल्याने फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:57 AM2020-10-24T11:57:36+5:302020-10-24T11:58:01+5:30
Nagpur News Corona ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. परिणामी, जवळपास २५०० इंजेक्शनचा साठा कालबाह्य होण्याच्या म्हणजे एक्सपायरीच्या उंबरठ्यावर आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात नागपुरातील रुग्णसंख्येने धडकी भरवली होती. यातच कोरोनावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा पडला होता. विविध खासगी हॉस्पिटलसह औषध विक्रेत्यांनी कंपनीकडे या इंजेक्शनची मागणी केली. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठा साठा आला. ऑक्टोबर महिन्यात मात्र रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. परिणामी, जवळपास २५०० इंजेक्शनचा साठा कालबाह्य होण्याच्या म्हणजे एक्सपायरीच्या उंबरठ्यावर आहे.
नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुभार्वाला सुरुवात झाली. परंतु ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या वाढीने वेग धरला. ऑगस्ट महिन्यात २५ हजार २२९ नव्या रुग्णांची भर पडली. सप्टेंबर महिन्यात याच्या दुप्पट, ५२ हजार १५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती. कोविडच्या उपचारात मोजक्याच औषधी आहेत. रेमडेसिवीर हे इंजेक्शन पहिल्या पाच दिवसांत रुग्णांना दिल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचा डॉक्टरांचा अनुभव होता. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. परंतु मागणीच्या तुलनेत मोजकाच साठा असल्याने तुटवडा पडला. परिणामी, काळाबाजार झाला.
शासनाला यात लक्ष घालून ठराविक औषधांच्या दुकानात २,३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे लागले. रुग्ण वाढणार या भीतीने काही औषध विक्रेत्यांनी व खासगी हॉस्पिटलनी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी केली. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येत घट आल्याने अनेकांकडे या इंजेक्शनचा साठा पडून आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला २५०० इंजेक्शन नागपुरात आहे. परंतु रुग्ण फारच कमी असल्याने व एक्सपायरी डेट केवळ तीनच महिन्याची असल्याने कालबाह्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नॉनकोविड औषधांनाही फटका
कोरोनाच्या सात महिन्याच्या काळात नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी घट आली होती. मेयो, मेडिकलची ओपीडी इतर दिवशी तीन हजारावर जायची ती ५००वर आली होती. खासगी हॉस्पिटलमधीलही हीच स्थिती होती. यामुळे या रुग्णांना लागणाऱ्या साधारण औषधांची उचलच झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, शासकीय रुग्णालयात अशा १० टक्के औषधीही एक्सपायरीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती आहे.