२५८ स्कूल बस चालकांना परवाना रद्दची नोटीस
By admin | Published: June 24, 2016 03:06 AM2016-06-24T03:06:03+5:302016-06-24T03:06:03+5:30
अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टाळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने काढले.
आरटीओ : बस, व्हॅन चालकांचे दणाणले धाबे
नागपूर : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टाळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने काढले. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वचक नसल्याने की काय मुदतवाढ देऊनही १५०० मधून ५० टक्केही स्कूल बस व व्हॅन चालक तपासणीसाठी आलेच नाहीत. याला गंभीरतेने घेत शहर आरटीओने गुरुवारपर्यंत १५८ तर पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १०० वाहनांना तुमचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे बस व व्हॅन चालकांचे धाबे दणाणले आहे.
न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या सूचनेनुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार प्रत्येक आरटीओ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मे ते ५ जून या कालावधीत ही तपासणी बंधनकारक करण्यात आली. तपासणीसाठी कोणतेही शुल्क न घेता निरीक्षकाद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार होती.
यात वाहनाचा रंग, स्कूल बसवर नावाची नोंद, शाळेचे नाव, बसच्या पायरीची नेमून दिलेली उंची या शिवाय धोक्याचे इशारे देणारी प्रकाश योजना, वेग नियंत्रक, दरवाजा उघडण्यासाठी हँडल, आपात्कालीन दरवाजा, चालकास आपात्कालीन परिस्थितीची माहिती होण्याकरिता सूचना मिळण्याची सोय अशा एकूण १५ ते २० नियमांची पूर्तता करणाऱ्या बसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार होते. परंतु एक महिन्याचा कालावधी देऊनही अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
शहरात एकूण १५०५ स्कूल बस व व्हॅनची नोंद आहे. यातील शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ५९९ तर पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गंत ९०६ बस व व्हॅन येतात. मात्र, परिवहन विभागाच्या आदेशानंतरही यातील ५० टक्केही वाहन चालकांनी आपल्या वाहनाची तपासणी केली नाही. अखेर याची गंभीर दखल घेत गुरुवारपर्यंत शहर आरटीओने १५८ तर पूर्व आरटीओने १०० स्कूल बस व व्हॅन चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
सात दिवसानंतर त्यांचे उत्तर ऐकून घेतल्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु नोटीस प्रकरणामुळे दोन्ही वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)