२६ डब्यांची गाडी उभी राहणार कुठे ?
By admin | Published: February 27, 2015 02:00 AM2015-02-27T02:00:50+5:302015-02-27T02:00:50+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करतांना रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याची घोषणा केली आहे.
वसीम कुरैशी नागपूर
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करतांना रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याची घोषणा केली आहे. परंतु देशातील ‘वर्ल्ड क्लास’ रेल्वेस्थानकाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर एकूण ८ प्लॅटफॉर्मपैकी १ आणि नवनिर्मित ८ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरच ही सुविधा आहे. उर्वरित ६ प्लॅटफॉर्मवर २६ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहण्याची व्यवस्थाच नाही. अशा परिस्थितीत नागपूरचे रेल्वे स्थानक ‘वर्ल्ड क्लास’ होणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रेल्वे विभाग सुरक्षेला सर्वतोपरी मानतो. परंतु नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर मात्र सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास करण्याच्या घोषणा यापूर्वी अनेकदा झाल्या. परंतु पायाभूत सुविधासुद्धा आतापर्यंत उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. स्टेशनवरील २, ३ आणि ६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर २४ डब्यांची रेल्वे गाडी उभी राहू शकते. ४, ५, आणि ७ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर १८ आणि २० डब्यांची गाडी येऊ शकते.