२६ बालमजुरांची तस्करी : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:58 AM2019-03-27T00:58:11+5:302019-03-27T01:03:47+5:30

दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्यात घेतले. या बालकांना शासकीय मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले असून बुधवारी त्यांना चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करण्यात येणार आहे.

26 Child labor trafficked: Accused arrest from Danapur-Secunderabad Express | २६ बालमजुरांची तस्करी : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून घेतले ताब्यात

२६ बालमजुरांची तस्करी : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दल, रेल्वे चाईल्ड लाईनची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्यात घेतले. या बालकांना शासकीय मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले असून बुधवारी त्यांना चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करण्यात येणार आहे.
रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने मोठ्या प्रमाणात बालमजुरांची तस्करी होत असल्याची माहिती रेल्वे चाईल्ड लाईनला मिळाली. रेल्वे चाईल्ड लाईनने ही माहिती रेल्वे सुरक्षा दलाला दिली. खरोखर या गाडीत बालमजूर आहेत का हे पाहण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने नरखेडवरून दोन जवानांना गाडीत पाठविले. या जवानांनी कोच क्रमांक एस ८, ९, १०, ११ आणि मागील जनरल कोचमध्ये बालक प्रवास करीत असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांना दिली. ही गाडी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर येताच २६ बालकांना गाडीखाली उतरविले. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंग चौहान, स्टेशन संचालक दिनेश नागदेवे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, उपस्टेशन व्यवस्थापक राजू इंगळे, वाणिज्य विभागाचे कर्मचारी आणि २० आरपीएफ जवानांचा ताफा प्लॅटफार्मवर हजर होता. या बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी आरपीएफ ठाण्यात आणले. तेथे त्यांच्यासाठी जेवण बोलविण्यात आले. विविध कामासाठी विविध ठिकाणी नेण्यात येत असल्याची माहिती बालकांनी चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना दिली. हे बालक बिहार, दानापूर, खगरिया, मध्य प्रदेशातील शहडोल, झिरीया अशा विविध भागातील आहेत. ही कारवाई वरदान इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ अ‍ॅडॉप्शनच्या अध्यक्ष डॉ. मंगला देशकर, सचिव सरोज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कामासाठी नेत होते बालकांना
दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये ताब्यात घेतलेल्या मुलांना विविध कामांसाठी नेण्यात येत होते. यात सिकंदराबादला मेट्रोचे पाईप तयार करण्यासाठी ११ बालकांना नेण्यात येत होते. तीन बालकांना सिकंदराबादच्या पाईप कंपनीत आणि दोन बालकांना फळांचे लोडींग करण्यासाठी नेण्यात येत होते तर दोन बालकांना पेंटिंगच्या कामासाठी सिकंदराबादला नेण्यात येत होते.

पुन्हा आढळले नऊ बालक
दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील बालकांना गाडीखाली उतरविण्याच्या कारवाईसाठी या गाडीला २० मिनिटे अधिक उशीर झाला. दरम्यान या गाडीत आणखी बालमजूर असल्याची शंका असल्यामुळे आरपीएफने दोन जवानांना या गाडीत पाठविले होते. जवानांना या गाडीत आणखी नऊ बालक आढळले. त्यातील पाच बालक अल्पवयीन असून त्यांना बल्लारशाह रेल्वेस्थानकावर गाडीखाली उतरविण्यात आले. तेथे या बालकांना चंद्रपूर रेल्वे चाईल्ड लाईनच्या स्वाधीन करण्यात आले.

बहुतांश बालकांचा जन्म १ जानेवारीचा
ताब्यात घेण्यात आलेल्या २६ पैकी १६ बालकांजवळ आढळलेल्या आधारकार्डवर त्यांची जन्मतारीख १ जानेवारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक सारखी जन्मतारीख असल्यामुळे या बालकांजवळील आधारकार्ड बनावट असल्याची शंका रेल्वे चाईल्ड लाईनने व्यक्त केली आहे.

बेस किचनचे भोजन निघाले निकृष्ट दर्जाचे 
बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी आरपीएफ ठाण्यात आणल्यानंतर त्यांची आस्थेने चौकशी करण्यात आली. यातील बहुतांश बालकांना भूक लागल्यामुळे त्यांच्यासाठी आयआरसीटीसीच्या जनाहारमधून भोजन बोलविण्यात आले. परंतु दोन घास तोंडात टाकताच बालकांनी या भोजनाकडे पाठ फिरविली. भोजन का करीत नसल्याचे विचारताच या बालकांनी शिळ्या अन्नाची दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यावर रेल्वे सुरक्षा दलाने हे भोजन तपासले असता हे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले. यावरून जनाहारमध्ये प्रवाशांना निकृष्ट भोजन पुरविण्यात येत असल्याची बाब स्पष्ट झाली.

Web Title: 26 Child labor trafficked: Accused arrest from Danapur-Secunderabad Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.