एकाच रात्रीत २६ फिडर ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:24 AM2017-09-19T00:24:17+5:302017-09-19T00:24:43+5:30
राज्यभरात पाऊ स सुरू असल्याने विजेची मागणी कमी झाल्याने भारनियमन कमी झाल्याचा दावा वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महावितरण कंपनीने केला आहे.
कमल शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात पाऊ स सुरू असल्याने विजेची मागणी कमी झाल्याने भारनियमन कमी झाल्याचा दावा वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महावितरण कंपनीने केला आहे. नागपूर जिल्ह्याला भारनियमनातून वगळण्यात आल्याचाही दावा केला जातो. अशा गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात. प्रत्यक्षात हा दावा तांत्रिक त्रुटी लपविण्यासाठी केला जात आहे. मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू असून यासाठी तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे केले जात आहे. प्रत्यक्षात यामागील वास्तव वेगळेच आहे.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात वीज पुरवठा कसा, याची माहिती घेतली असता जिल्ह्यातील २६ फिडर रविवारी रात्री उशिरापर्यंत ठप्प पडले होते. एका फिडरवर साधारणत: एक हजार जोडण्या असतात. याचा विचार करता २६ हजार जोडण्याचा वीज पुरवठा बंद होता. यामुळे लाखो लोकांना रात्र उकाड्यात काढावी लागली.
रात्री उशिरा ते सोमवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा ठप्प होता. पावसामुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु वीज कंपन्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली एप्रिल ते जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात भारनियमन केले होते. त्याचवेळी दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगितल्याने यात तथ्य आहे. एक-दीड तासात वीज पुरवठा सुरळीत होईल, असा दावा महावितरण व एसएनडीएल यांच्याकडून केला जातो. प्रत्यक्षात रात्रभर वीज न आल्याने नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली.
बंद संचावरही प्रश्नचिन्ह
कोळशाचा पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करून वीज उत्पादक कंपन्या राज्यात भारनियमन करीत आहे. परंतु कोळशाही कमतरता हे एक निमित्त आहे. वास्तविक राज्यातील वीज निर्मितीचे १८ संच ठप्प आहेत. यात महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रातील १२ संचाचा समावेश आहे. यातील तीन संच वार्षिक दुरुस्तीसाठी तर दोन कोळशाचा पुरवठा नसल्याने बंद आहे. तारापूर अणुऊर्जा संयंत्र तांत्रिक कारणामुळे प्रभावित झाला आहे. यातील १६० मेगावॅट क्षमतेचे एक रिएक्टर रिफिलिंग व ५४० मेगावॅट क्षमतेचे तांत्रिक कारणामुळे तर एक दुरुस्तीला काढले आहे. खासगी वीज निर्मिती केंद्रांना तांत्रिक कारणांचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक कारणामुळे मोठ्याप्रमाणात संच बंद असताना वार्षिक देखभाल करण्याच्या नावाखाली संच बंद का ठेवण्यात आले. असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात काहीतरी काळेबेरे आहे. अधिकारी स्वत:ची चूक लपविण्यासाठी राज्याला भारनियमनाच्या संकटात लोटत आहे.
इथे बंद होता वीज पुरवठा
वीज वितरण कंपनी एसएनडीएलच्या माहितीनुसार त्यांचे २० फिडर बंद होते. यात सोमवारी क्वॉर्टर, भंडारा रोड, वैशालीनगर, मंगळवारी, सदर, मकरधोकडा, वाडी, गांजाखेत, वर्धमाननगर, रामगिरी, लाल इमली, घाट रोड, रामबाग, भगवान नगर, विश्वकर्मानगर, बाबुळखेडा, भक्ती विहार, आमदार निवास, सूतगिरणी, जानकीनगर आदी भागाला वीज पुरवठा करणाºया फिडरचा समावेश होता. महावितरणच्या क्षेत्रातील चिंचभुवन फिडरवरील भागासोबतच बुटीबोरी परिसरात रात्री अडीच वाजेपासून सकाळी ११ पर्यंत वीज पुरवठा बंद होत. तसेच छत्रपती चौक, पांडे ले-आऊ ट, रेल्वे फिरडशी संबंधित भागात अनेक तास वीज पुरवठा खंडित होता.