नागपुरात शटर वाकवून २६ लाखांचे मोबाईल पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 08:19 PM2021-09-15T20:19:30+5:302021-09-15T20:19:55+5:30
Nagpur News नागपुरात धरमपेठमधील कॉफी हाऊस चौकात मंगळवारी रात्री एका मोबाईल शॉपीचे शटर वाकवून २६.५० लाखांचे मोबाईल चोरी केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठमधील कॉफी हाऊस चौकात मंगळवारी रात्री एका मोबाईल शॉपीचे शटर वाकवून २६.५० लाखांचे मोबाईल चोरी केल्याची घटना घडली. अतिशय वर्दळीच्या आणि व्हीआयपी परिसरात चोरी झाल्यामुळे अंबाझरी पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॉफी हाऊस चौकात पवन केवलरामानी यांची वन प्लस मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी मोबाईल शॉपीचे शटर वाकविले. शटर वाकवून अंगाने सडपातळ असलेल्या अल्पवयीन आरोपीने आत प्रवेश केल्याची पोलिसांना शंका आहे. त्याने शोकेसमध्ये ठेवलेले ६५ मोबाईल तसेच इतर साहित्य चोरी केले. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद होऊ नये यासाठी आरोपीने डीव्हीआर काढून घेतला. जवळपास २६.५० लाखाचा मुद्देमाल घेऊन चोरट्याने पळ काढला.
बुधवारी सकाळी या घटनेची माहिती कळताच, अंबाझरी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी श्वानाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. श्वान घटनास्थळापासून रस्त्यापर्यंत येऊन थांबला. त्यामुळे आरोपी वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. पोलीस परिसरातील स्मार्ट सिटी योजनेतील सीसीटीव्हीवरून आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळ अंबाझरी पोलिसांचा प्रमुख चौक आहे. येथे नियमित गस्त घालण्यात येते. तरीसुद्धा चोरटे बिनधास्तपणे चोरी करून पळून गेले. अशा प्रकारच्या घटनेत मोबाईल चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा हात असतो. ही टोळी एका राज्यातून चोरलेले मोबाईल दुसऱ्या राज्यात नेऊन विकतात. शहरात अनेकदा अशा पद्धतीने मोठ्या मोबाईल शोरुममध्ये चोरी करण्यात आली आहे.
..........