उपराजधानीत २५ दिवसात २६ विना हेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:26 AM2018-09-03T10:26:15+5:302018-09-03T10:28:38+5:30
मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेल्या २५ दिवसांमध्ये अपघातात गंभीर १०४ जखमींपैकी ९० टक्के दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. परिणामी, २६ जखमींना आपल्या प्राणाला मुकावे लागल्याचे आढळून आले.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्याचा शासनस्तरावर प्रयत्न होत आहे. वाहतूक पोलीस विभागाकडूनही मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे, असे असतानादेखील बहुसंख्य दुचाकीचालकांना हेल्मेट हे ओझे वाटते. परिणामी, अपघात झाल्यास मेंदूला जबर मार बसून जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेल्या २५ दिवसांमध्ये अपघातात गंभीर जखमी रुग्णांचा डॉक्टरांनी अभ्यास केला असता, १०४ जखमींपैकी ९० टक्के दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. परिणामी, त्यांच्या मेंदूला जबर मार बसून २६ जखमींना आपल्या प्राणाला मुकावे लागल्याचे आढळून आले.
भारतात रस्ता अपघातातील मृत्यूची संख्या ही कुठल्याही आजाराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. म्हणूनच अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सेवा मिळून त्यांना जीवनदान मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या दोन वर्षांत ‘न्यूरोसर्जरी’ म्हणजे मेंदूवरील शस्त्रक्रियेसह, अस्थिव्यंग, सामान्य, दंत व ‘प्लास्टिक सर्जरी’चे प्रमाण वाढले आहे. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची चमू येथे कार्यरत असल्याने जखमींचा जीव वाचत आहे. हे ‘सेंटर’ अनेकांसाठी वरदान ठरत आहे. परंतु मृत्यूचा दरही २६ टक्के आहे. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’चे आर्थाेपेडिक सर्जन डॉ. मोहम्मद फैजल यांनी पुढाकार घेऊन आलेल्या जखमींची माहिती घेणे सुरू केले. प्राथमिक स्तरावर त्यांना मिळालेली माहिती ही थक्क करणारी आहे. आॅगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे २५ दिवसांपासून संकलित करण्यात आलेल्या या माहितीच्या आधारे ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये १०४ गंभीर जखमी उपचारासाठी दाखल झाले. यातील ९० टक्के जखमींनी हेल्मेट घातलेले नव्हते. यातील २६ जखमींच्या मेंदूला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींमध्ये काही बरे झाले असलेतरी काही रुग्णांना अपंगत्व, तर काहींवर कायमचे खाटेवर पडून राहण्याची वेळ आली आहे.