नर्सिंगच्या प्रवेशासाठी जागांपेक्षा तिप्पट अर्ज, ११ जूनला सीईटी
By निशांत वानखेडे | Published: June 1, 2023 05:21 PM2023-06-01T17:21:18+5:302023-06-01T17:23:40+5:30
७ हजार जागांसाठी २६ हजार अर्ज
नागपूर : नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी सामान्य प्रवेश परीक्षा (सीईट) येत्या ११ जून रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित होणार आहे. राज्यात सरकारी व खासगी नर्सिंग महाविद्यालयात ७ हजार ३६० जागा उपलब्ध असून त्यासाठी २६ हजार ३११ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी ओढा वाढला असून यंदा जागांपेक्षा तिप्पटपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) द्वारे लवकरच ११ जूनला होणाऱ्या प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करण्यात येतील. राज्यातील सरकारी व खासगी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ३१,४५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २६,३११ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. राज्यात नर्सिंगची पाच सरकारी महाविद्यालये असून त्यात २५० जागा आहेत तर १४३ खासगी महाविद्यालये असून त्यात ७,११० जागा, अशा एकूण ७,३६० जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी २६,३११ विद्यार्थ्यांमध्ये चुरस राहणार आहे. परीक्षेचे हॉल तिकिट सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल व विद्यार्थ्यांना ते डाउनलोड करावे लागेल.
नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर राज्यातील सरकारी व खासगी रुग्णालयात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कोरोना नंतर नर्सिंग अभ्यासक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे. सरकारकडून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत आरोग्यसेवकांच्या भरतीवरही लक्ष केंद्रीत केले जात आहे. शिवाय मोठ्या संख्येने खासगी रुग्णालये सुरू होत असल्याने रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल नर्सिंगच्या अभ्यासक्रमाकडे वळला आहे.