केरळच्या पूरग्रस्तांसाठी सरसावले रेल्वेचे २६ हजार कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:23 PM2018-08-24T23:23:57+5:302018-08-24T23:24:54+5:30
केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.
केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून खाद्यसामुग्रीसह इतर वस्तू रवाना करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने ही सामुग्री पाठविणाºया संस्थांकडून एक रुपयाही न घेता सामुग्री पाठविण्याची घोषणा केली आहे. एवढ्यावरच रेल्वेचे कर्मचारी थांबले नाहीत, तर पूरग्रस्तांसाठी काहीतरी ठोस मदत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी सरसावले आहेत. त्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर, वर्धा, धामणगाव, पुलगाव, काटोल, नरखेड, पांढुर्णा, बैतुल, वरोरा, हिंगणघाट, अजनी मिळून एकूण १५ हजार कर्मचारी आहेत. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोतीबाग, इतवारी, गोंदिया, भंडारा, डोंगरगड, राजनांदगाव, छिंदवाडा, नैनपूरसह लहानमोठे असे ७६ स्टेशन आहेत. येथील ११५०० कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. गँगमनपासून तर अधिकाºयांपर्यंत सर्वच जण आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत निधीत रक्कम जमा करणार आहेत. आगामी २६ तारखेपर्यंत मदतनिधी गोळा करून आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत गोळा झालेली रक्कम पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून देशप्रेमाची भावना दाखवून दिली आहे.
महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करणार रक्कम
‘रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात करून गोळा करण्यात येईल. गोळा झालेली रक्कम आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे.’
-ए. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.