एलटीटी मुंबई-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढल्या
By नरेश डोंगरे | Published: December 21, 2023 07:51 PM2023-12-21T19:51:49+5:302023-12-21T19:52:12+5:30
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेषची मुदत २६ डिसेंबरला संपुष्टात येणार होती. मात्र, या गाडीत प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने आता या गाडीच्या १३ फेऱ्या वाढविल्या. त्यामुळे ही गाडी आता २६ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे.
त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०११२८ बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष २७ डिसेंबर २०२३ पर्यंत धावणार असे अधिसूचित करण्यात आले होते. मात्र, या गाडीच्यासुद्धा १३ फेऱ्या वाढवण्यात आल्याने ही गाडी आता २७ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांमध्ये ६ वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन तसेच ४ सामान्य द्वितीय श्रेणी असे एकूण २१ डबे राहणार आहे. गाडी पूर्वीच्या वेळेलाच सुटणार आहे. थांब्यामध्येही कसलाही बदल करण्यात आलेला नाही.