विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांना २.६४ लाखांची आर्थिक मदत
By आनंद डेकाटे | Published: May 2, 2024 05:02 PM2024-05-02T17:02:16+5:302024-05-02T17:04:42+5:30
विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत विद्यार्थ्यांना दिलासा : कुलगुरूंच्या हस्ते धनादेश वितरित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठानेविद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत तीन विद्यार्थ्यांना एकूण २.६४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत ही मदत करण्यात आली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते गुरुवारी आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत सहायता निधी प्राप्त करणाऱ्यांमध्ये योगिता रवींद्र मोहीनकर, दृष्टी सुरेश नेरीकर व प्रफुल्ल हरिदास चलाख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कुलगुरू कक्षात धनादेश वितरण प्रसंगी विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक व राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. योगिता रवींद्र मोहीनकर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात एमफार्म २ ची विद्यार्थिनी होती. योगिताचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उपचाराकरिता लागलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून तिचे पालक रवींद्र मोहिनकर यांच्या नावे १ लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
सेवादल महिला महाविद्यालयाची २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील कला शाखेच्या तृतीय वर्षातील विद्यार्थिनी दृष्टी सुरेश नेरीकर हिला उपचार घेण्याकरिता झालेला खर्च म्हणून १ लाख रुपयांची मदत विद्यार्थी कल्याण योजनेतून करण्यात आली. विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील २०२२-२३ या शैक्षणिक सत्रातील एमए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी प्रफुल्ल हरिदास चलाख या विद्यार्थ्याला अपघात झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याकरिता झालेल्या उपचाराचा खर्च म्हणून ६४ हजार ३४७ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सर्व संलग्नित, संचालित तसेच शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाचा अपघात अथवा मोठ्या आजारात वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून केला जाते. विद्यापीठाकडून राबविला जात असलेल्या विविध विद्यार्थी कल्याण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी केले आहे.