नागपूर शहरात २६५ अवैध होर्डिंग्ज; महापालिकेने बजावली नोटीस
By मंगेश व्यवहारे | Updated: May 9, 2023 15:04 IST2023-05-09T15:02:17+5:302023-05-09T15:04:16+5:30
शहरातील इमारतींवर, रस्त्याच्या फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगमध्ये २६५ होर्डिंग हे अवैध असल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे.

नागपूर शहरात २६५ अवैध होर्डिंग्ज; महापालिकेने बजावली नोटीस
नागपूर: शहरातील इमारतींवर, रस्त्याच्या फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगमध्ये २६५ होर्डिंग हे अवैध असल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेने केलेल्या सर्वक्षेणात शहरात २६५ होर्डिंग अनाधिकृत असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे हे अवैध होर्डिंग ज्यांनी होर्डिंग साठी परवानगी घेतली आहे, त्यातील आहे. जे परवानगी न घेता होर्डिंग लावतात, त्यांची संख्या आणखी जास्त आहे. या २६५ अवैध होर्डिंग मागची अनेक कारणा आहेत.
जमिनीपासून १० फुट उंचीवर होर्डिंग लावलेले नाही. फुटपाथवरील होर्डिंगची उंची ४० फुटाच्या वर आहे. होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, बिल्डींग स्टॅबिलिटी, होर्डिंगमुळे इमारतीमध्ये खिडक्या, गॅलरीद्वारे येणारा प्रकाश व हवेचा मार्ग बंद करून होर्डिंग लावले गेले आहेत, ही कारणे पुढे आली आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून नवीन होर्डिंग्जला परवानगी देतांना किंवा जुन्या परवान्याचे नुतनीकरण करतांना होर्डिंग व्यावसायिकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून इमारतीची क्षमता तपासली जायची. परंतु ९ मे २०२२ च्या नवीन होर्डिंग्ज धोरणानुसार ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही अट सोडून विभागाने होर्डिंग्जविरुद्ध नोटीस बजावली आहे.