नागपूर जिल्ह्यात २,६६१ लसीकरण केंद्र स्थापन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:17+5:302020-12-09T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनावरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. जिल्ह्यात एकूण २ हजार ६६१ ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका हद्दीत ९०२ तर ग्रामीण भागात १ हजार ७५९ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे कोरोना विषाणू लसीकरणाबाबत करावयाच्या नियोजनासंदर्भात जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ही माहिती सादर करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उप जिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे अश्विनी नागर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. महम्मद साजीद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अर्चना कोठारी उपस्थित होते. लसीकरणासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ५९७ लस टोचणाऱ्या ‘नर्सिंग स्टाफ’ची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेकडील २०९ तर ग्रामीण भागातील आरोग्य विभागातील ३८८ परिचारिकांचा समावेश आहे. लस टोचणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केल्या जाईल. तसेच लसीकरण केलेल्या व्यक्तीला अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबविण्यात येईल. लसींच्या साठ्यांसाठी सर्व केंद्रांवर शीत कपाटे उपलब्ध राहतील, अशी माहिती अश्विनी नागर यांनी दिली.
वैद्यकीय क्षेत्राला लसीकरणात प्राधान्य
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस तसेच जोखमीच्या रूग्णांना प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक कोरोना योद्ध्याला देखील लसीकरण करण्यात येईल. यासाठी आरोग्य विभागाने सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करावे. महानगरपालिका क्षेत्र तसेच पंचायत समितीअंतर्गत रुग्णालयांनी त्यांच्याकडील डॉक्टर्स तसेच परिचारिका यांची लसीकरणासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. अॅलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टर्स तसेच परिचारिकांचा यात समावेश करण्यात येणार आहे. कोरोनावरील लसीकरण म्हणजे पूर्णत: सुरक्षा नसून नंतरच्या कालावधीतही काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.