२६ रोजी नागपुरातील संविधान चौकात शिक्षक महिला करणार मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:01 PM2018-09-20T23:01:04+5:302018-09-20T23:03:55+5:30
नागपूर महानगरपालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता संघटनेने वेळोवेळी विविध मार्गाने शांततापूर्वक आंदोलने करण्यात आली, परंतु शासन व प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून सामूहिक मुंडण आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. मुुंडणासाठी महिला शिक्षकांनीही आपली नावे नोंदविलेली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता संघटनेने वेळोवेळी विविध मार्गाने शांततापूर्वक आंदोलने करण्यात आली, परंतु शासन व प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून सामूहिक मुंडण आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. मुुंडणासाठी महिला शिक्षकांनीही आपली नावे नोंदविलेली आहेत.
आंदोलने केली त्यात धरणे आंदोलन, निर्धार सभा, निषेध सभा, लक्षवेध आंदोलन, विधानसभेवर मोर्चा तसेच साखळी उपोषण करण्यात आले. एवढेच नव्हे शिक्षक दिनाच्या प्रशासकीय कार्यक्रमावर सामूहिक बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतरही शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता संविधान चौक येथे २६ सप्टेंबरला दुपारी दीड वाजतापासून मुंडण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आंदोलनात मुंडण करण्यासाठी शेकडो शिक्षकांनी सहमती दर्शवली आहे. यात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे, देवराव मांडवकर ,मधुकर भोयर, दीपक सातपुते, अशोक बालपांडे, प्रफुल चरडे, विनायक कुथे, प्रकाश देऊळकर, आनंद नागदिवे, अशोक वायकुळे, राकेश दुंप, शेखर वानस्कर, रामराव बावणे, अजय गुंडमवार ,श्रीकांत गडकरी, रवी खंडाईत, अनिल बारस्कर, गजानन सेलोरे, सय्यद हसन अली, संतोष विश्वकर्मा, नितीन भोळे, अरुण ढोबळे, लक्ष्मण बगडे, प्रमोद वाघाडे,चंद्रमणी मून, राजकुमार बोंबाटे, कृष्णा उजवणे, विनय बरडे, ज्ञानेश्वर शेंडे आदींनी केस दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कोणतेही आंदोलन यशस्वी करण्याकरिता एकजुटीची आवश्यकता आहे, याकरिता जास्तीत जास्त शिक्षकांनी या आंदोलनाकरिता तसेच संघटनेचे बळ वाढवण्याकरिता सहमती दर्शवून आपले नाव संघटनेत द्यावे असे आवाहन संघटनेने केले आहे. २६ सप्टेंबरपर्यंत मुंडण आंदोलनासाठी शेकडो शिक्षकांची नोंदणी होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महिला शिक्षकही केसदान करणार
शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लागाव्या यासाठी मुंडण आंदोलनात शिक्षक महिलाही सहभागी होणार आहेत. यासाठी पहिल्याच दिवशी पाच महिला शिक्षकांनी नावे नोंदविली. यात कल्पना महल्ले, गीता विष्णू, संध्या तावडे यांच्यासह अन्य शिक्षक महिलांचा समावेश आहे. बुधवारपर्यंत मोठ्याप्रमाणात महिला श्क्षिक मुंडणासाठी नोंदणी करणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.