बोगस पदवीचे विद्यापीठात कनेक्शन आहे का?, संशय असल्यास तक्रार द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 01:18 PM2023-06-30T13:18:09+5:302023-06-30T13:23:19+5:30
पोलिसांचे नागपूर विद्यापीठाला पत्र
नागपूर : इराकमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावावर बोगस पदवीच्या आधारे नोकऱ्या मिळविणाऱ्या २७ विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे, असे पत्र विद्यापीठाने अंबाझरी पोलिसांना दिले होते. या प्रकरणात कोणावर संशय असल्यास अधिकाऱ्यांबाबत तक्रार द्या, अशा आशयाचे पत्र अंबाझरी पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा लोगो, नाव आणि कुलगुरुंची स्वाक्षरी असलेल्या २७ पदव्या आणि प्रमाणपत्र बोगस असल्याची बाब इराक येथील दूतावासाच्या निदर्शनास आली. यात फार्मसी, अभियांत्रिकी आणि मायक्रोबॉयोलॉजी अभ्यासक्रमाच्या पदव्यांचा समावेश होता. दूतावासाने तिन्ही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांबाबत माहिती घेऊन पदव्यांची तपासणी केली असता २७ पदव्या बोगस असल्याचे पुढे आले होते. त्यासाठी दूतावासाचे समन्वयक मुंबईवरून नागपुरात आले. त्यांनी कुलगुरुंशी चर्चा करून दूतावासाला माहिती दिली. त्यानंतर इराकमध्ये विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी विद्यापीठाला कोणावर शंका असल्यास तक्रार देण्याविषयी २८ जूनला पत्र दिले आहे. २९ जूनला आषाढी एकादशीनिमित्त सुटी असल्यामुळे विद्यापीठाने अंबाझरी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. ३० जूनला विद्यापीठाचे अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बोगस पदवी प्रकरणात कुणावर शंका असल्यास विद्यापीठाने पोलिसांना सूचना देऊन तक्रार द्यावी, असे पत्र विद्यापीठाला देण्यात आले आहे. विद्यापीठातून तक्रार आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.
- गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबाझरी पोलिस स्टेशन