नागपुरात २७ लाखांची ब्राऊन शूगर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:09 AM2018-07-04T00:09:36+5:302018-07-04T00:10:38+5:30
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी एका महिलेला अटक करून तिच्याकडून १० हजार रुपये आणि २६ लाख, ७५ हजारांची ब्राऊन शूगर (कच्ची हेरॉईन) जप्त केली. चित्रा मनोज रहांगडाले (वय ३०) असे आरोपी महिलेचे नाव असून ती शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी एका महिलेला अटक करून तिच्याकडून १० हजार रुपये आणि २६ लाख, ७५ हजारांची ब्राऊन शूगर (कच्ची हेरॉईन) जप्त केली. चित्रा मनोज रहांगडाले (वय ३०) असे आरोपी महिलेचे नाव असून ती शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते.
अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या टोळीतील एक महिला हेरॉईनची मोठी खेप घेऊन जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून सोमवारी सायंकाळी पोलिसांनी इतवारी स्थानक परिसरात सापळा लावला. चित्रा तिच्या एव्हिएटर एमएच ३१/ व्हीएस ३५५७ ने शांतिनगरकडे जात असताना पोलिसांनी तिला थांबवून झडती घेतली असता तिच्या जवळ ६५९ ग्राम कच्ची हेरॉईन आणि मोबाईलसह १० हजारांची रोकडही सापडली. बाजारपेठेत या हेरॉईनची किंमत २६ लाख, ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी हेरॉईन, रोकड, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण २६ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सर्वात मोठी कारवाई
एनडीपीएस सेलकडून अलिकडे झालेली ही सर्वात मोठी कारवाई होय. अटक करण्यात आलेली चित्रा ही कुख्यात तस्कर चंदाची मुलगी होय. तिने ही खेप राजस्थान मधून उज्जैन आणि तेथून नागपुरात आलेल्या तस्कराकडून घेतल्याचे समजते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस सेलचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक चंदन, पीएसआय स्वप्नील वाघ, अर्जुन सिंग, हवलदार तुलसीदास शुक्ला, दत्ता बागुल, सतीश पाटील, नरेश शिंगणे, रुबिना शेख यांनी ही कामगिरी बजावली.