नागपुरात २७ दिवसांत गॅस्ट्रोचे २७० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:39 PM2019-04-27T23:39:21+5:302019-04-27T23:40:16+5:30
शहराचे तापमान वाढत असताना उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. उष्माघाताचे आतापर्यंत १४२ रुग्णांची नोंद झाली असताना गॅस्ट्रो रोगानेही तोंड वर काढले आहे. २७ एप्रिलपर्यंत या रोगाचे २७० रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. ही आकडेवारी केवळ मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यातील आहे. मेयो, मेडिकलमध्ये याच्या दुप्पट रुग्ण असावेत, अशी माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचे तापमान वाढत असताना उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. उष्माघाताचे आतापर्यंत १४२ रुग्णांची नोंद झाली असताना गॅस्ट्रो रोगानेही तोंड वर काढले आहे. २७ एप्रिलपर्यंत या रोगाचे २७० रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. ही आकडेवारी केवळ मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यातील आहे. मेयो, मेडिकलमध्ये याच्या दुप्पट रुग्ण असावेत, अशी माहिती आहे.
शासकीय रुग्णालयांच्या शीत वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या कमी आह. मात्र दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रोगाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आतापर्यंत बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) १२०० रुग्णांनी उपचार घेतले तर २७० रुग्णांना भरती करण्यात आले होते. भीषण
पाणीटंचाईमुळे पुढील दोन महिन्यात दूषित पाण्याचा वापर वाढल्यास याच्या चारपट रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे.
उष्माघाताचे मृत्यू नाहीत
मनपाचे आरोग्य अधिकारी (एम) डॉ. सरिता कामदार यांनी सांगितले, एप्रिल महिन्यापासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवली जात आहे. आतापर्यंत २७० रुग्णांची नोंद झाली आहे. तूर्तास उष्माघात मृत्यूची नोंद नाही.
बालकांना सांभाळा
मेडिकल व मेयो रुग्णालयात गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली असून, यात बालकांची संख्या मोठी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रोज ३० ते ४० टक्के रुग्ण या आजाराचे दिसून येतात. उन्हाच्या कडाक्यामुळे उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण, सर्दी, खोकला आदी किरकोळ आजारांनी लहान मुले ग्रस्त आहेत. गढूळ पाणी पिणे, शिळे अन्न, उन्हात फिरणे आदी कारणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
५० टक्के गॅस्ट्रोचे रुग्ण
गॅस्ट्रोची लक्षणे असलेल्या आजाराची ५० ते ६० टक्के रुग्ण रोज उपचारासाठी येत आहेत. यातील गंभीर रुग्णांवर भरती करून उपचार केले जात आहेत. हा आजार दूषित अन्न व पाण्यामुळे होतो. यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांत शीतपेय, आईसगोलामधून खाल्ला जाणारा बर्फ धोकादायक ठरत आहे. जेवणाआधी स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे.
-डॉ. अविनाश गावंडे
बालरोग तज्ज्ञ
मनपाकडून विविध उपाययोजना
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उष्माघात व गॅस्ट्रोवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व मनपाचे झोन कार्यालय व दवाखान्यांवर ग्रीन मॅट टाकण्यात आल्या आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मजुरांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून मेट्रो व सिमेंट रस्त्यांची कामे दुपारी १२ ते ३ या वेळात बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. सर्व उद्याने दुपारी सुरू ठेवली जात आहेत. आपली बस व एसटी महामंडळाच्या बसचालकांना उन्हात निघताना भरपूर पाणी पिण्याचा व पाण्याची बॉटल्स सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सार्वजनिक पाणपोर्इंना पाण्याची शुद्धता पाळण्याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.
-डॉ. सरिता कामदार
आरोग्य अधिकारी, मेडिसीन विभाग, मनपा