वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य
By दयानंद पाईकराव | Published: June 22, 2024 05:53 PM2024-06-22T17:53:20+5:302024-06-22T17:53:41+5:30
धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीने आमच्या साहेबांसोबत बोला असे म्हणून फोन आपल्या साथीदाराला दिला.
नागपूर : तुम्ही मोबाईल लाऊन इतरांना त्रास देता त्यामुळे तुमच्या विरुद्ध पकड वारंट निघाला आहे, अशी बतावणी करून वारंट रद्द करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध आर्किटेक्टची २.७५ लाखांनी फसवणूक केली. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारीला घडली असून पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विनोद रामदास गणवीर (७५, रा. प्लॉट नं. ३०४, शुअरटेक हॉस्पीटलजवळ) असे फसवणूक झालेल्या वृद्ध आर्किटेक्टचे नाव आहे. ते सेवानिवृत्त झाले असून धंतोलीत त्यांचे कार्यालय आहे. ते १४ फेब्रुवारीला आपल्या घरी असताना त्यांच्या लँडलाईनवर आरोपीने फोन केला. आपण सीबीआय मुंबई येथून बोलत असून तुमच्या विरुद्ध इतरांना फोन करून त्रास देता असा गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने आमच्या साहेबांसोबत बोला असे म्हणून फोन आपल्या साथीदाराला दिला. त्याच्या साथीदाराने तुमचा वारंट रद्द करण्यासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
त्यामुळे घाबरलेल्या गणवीर यांनी आरोपीच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे २ लाख रुपये जमा केले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा गणवीर यांना या केसमधून बाहेर काढण्यासाठी ७५ हजार रुपये घेऊन त्यांची २.७५ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी गणवीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध कलम ४१९, ४२०, सहकलम ६६ (ड) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.