हॉटेल्सकडून २.७९ लाखांचा दंड वसूल; एफडीएची कारवाई
By मोरेश्वर मानापुरे | Published: September 21, 2023 10:05 PM2023-09-21T22:05:41+5:302023-09-21T22:06:08+5:30
मिठाईवर उत्पादन व मुदतबाह्य तिथी नमूद करणे बंधनकारक
नागपूर : मिठाई विक्रेत्यांनी मिठाईच्या ट्रेवर उत्पादन आणि मुदतबाह्य तिथी लिहणे कायद्याने बंधनकारक आहे. पण कायद्याचे पालन न केलेल्या ४२ दुकानदारांकडून एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत केलेल्या दंडात्मक कारवाईत २.७९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
तसेच नमकीन, खोबा, बर्फी, कलाकंद बर्फी, मोदक, रसगुल्ला, पेढा, काजू कतली, लाडू, बुंदी, गुलाबजामुन, श्रीखंड, ऑईल, वनस्पती व कोकोनट पावडर या अन्न पदार्थांचे एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत एकूण १२९ नमूने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यातील १०१ नमूने प्रमाणित तर १२ नमूने अप्रमाणित असल्याचे आढळून आले. त्यात न्यायनिर्णय प्रकरणे दाखल करण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये १.६० लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तर ३ प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत.
सणासुदीच्या दिवसांत खोवा, मिठाई व दूध या अन्न पदार्थांपासून तयार होणारे अन्न पदार्थ उपयोगात आणले जातात. जनतेला हायजेनिक अन्न पदार्थ मिळावे म्हणून नागपूर विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील मिठाई विक्रेते, उत्पादक, हॉटेल्स, रेस्टॉरंट आदी व्यावसायिकांच्या नियमित तपासण्यात करण्यात येत आहेत. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास विभागाचा दूरध्वनी ०७१२-२५६२२०४ आणि एफएसएसएआयच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांनी केले आहे.