अबब...पूर्व विदर्भात पाच महिन्यात २७९ लोकांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 10:36 AM2022-07-05T10:36:54+5:302022-07-05T10:41:07+5:30
पूर्व विदर्भात मागील पाच महिन्यात २७९ सर्पदंश व दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : कमी झालेले जंगल, झुडूप आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची व्याप्ती, यामुळे सापांनी आपला मोर्चा लोकवस्तीच्या त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे. परिणामी, सर्पदंशाची प्रकरणे वाढली आहेत. पूर्व विदर्भात मागील पाच महिन्यात २७९ सर्पदंश व दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
केवळ ७२ सापच विषारी
साप या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती व आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५ जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ७२ साप हे विषारी असतात. त्यातूनही पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात.
- यामुळे वाढले सर्पदंशाचे प्रमाण
अनेक जण साप दिसताच कुतूहलापोटी त्याच्याजवळ जातात. साप पकडता येत नसतानाही टीव्हीवरून, किंवा मोबाइल पाहून तो पकडण्याचा प्रयत्न करतात. साप मारण्याच्या घटनेतही साप चावण्याचे प्रकार वाढतात. सापावर चुकून पाय पडल्यावर सर्पदंशाचे प्रमाणही मोठे आहे.
जून ते ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक आढळतात साप
पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पावसाचे पाणी साचते. यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात.
मानवी वस्तीजवळ चारच जातीचे विषारी साप
तज्ज्ञानुसार, मानवी वस्तीजवळ केवळ चारच जातीचे विषारी साप आढळून येतात. यात नाग, मण्यार, घोणस व फुरसे असतात. या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता या आपातकालीन परिस्थिची शास्त्रीय माहिती घेतल्यास सर्पदंशाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.
गडचिरोली जिल्ह्यात ९५ लोकांना सर्पदंश
जानेवारी ते मे-२०२२ या कालावधीत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक सर्पदंश गडचिरोली जिल्ह्यात झाले आहेत. येथे ९५ लोकांना साप चावले. यात एकाचा मृत्यू झाला. त्याखालोखाल भंडारा जिल्हा असून येथे ८३, चंद्रपूर जिल्ह्यात ३९, गोंदिया जिल्ह्यात ३२ व एक मृत्यू, नागपूर जिल्ह्यात २१, तर वर्धा जिल्ह्यात ७ सर्पदंशाचे प्रकरणांची नोंद आहे.
- सर्पदंश रुग्णांसाठी मयो, मेडिकल ठरतेय वरदान
विदर्भच नाही, तर आजूबाजूच्या राज्यातून सर्पदंशाचे रुग्ण नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये येतात. एकट्या जून महिन्यात मेयोमध्ये १० तर मेडिकलमध्ये ३३ रुग्णांची नोंद झाली. यात एका तरुणाचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- ‘ॲण्टिस्नेक व्हेनम’ उपलब्ध
विषारी साप चावलेल्या रुग्णाला वेळेत ‘ॲन्टिस्नेक व्हेनम’ लस दिल्यास जीवनदायी ठरते. ही लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध आहे. सर्पदंशावर नुकतेच मेडिकल ऑफिसर व परिचारिकांची कार्यशाळा घेण्यात आली. सर्पदंश झाल्यास तो साप विषारी आहे किंवा नाही यात वेळ न घालविता आणि स्वत:हून कुठलेही उपचार न करता तातडीने आरोग्य केंद्रावर जाऊन उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो.
- डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर
- सहा जिल्ह्यांतील सर्पदंश (जानेवारी ते मे २०२२)
जिल्हा : सर्पदंश : मृत्यू
गडचिरोली : ९५ : ०१
भंडारा : ८३ : ००
चंद्रपूर : ३९ : ००
गोंदिया : ३२ : ०१
नागपूर : २१ : ००
वर्धा : ०७ : ००