नागपुरात २८ सफाई कर्मचारी बडतर्फ ; ३५ जणांची विभागीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:22 PM2020-03-17T23:22:44+5:302020-03-17T23:24:23+5:30
कोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले. महापालिकेत प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आली. यामुळे कामावर हजर न राहणाऱ्या सफाई ऐवजदारांचे धाबे दणाणले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच गैरहजर राहणाºया सफाई कर्मचाऱ्यांचा डाटा संकलित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. दीड महिन्यात गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतही मुंढे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेत ६ हजार स्थायी तर २ हजार ११३ ऐवजदार सफाई कर्मचारी आहेत. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याने दररोज ५०० मीटर रस्ता स्वच्छ करणे आवश्यक आहे. परंतु मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी ड्यूटीवर नसतात. वेगवेगळी कारणे सांगून अनेक कर्मचारी अनेक दिवस बेपत्ता असतात. परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. आयुक्तांनी दररोज ड्यूटीवर हजर राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची यादी मागविणे सुरू केले. यात अनेक दिवस बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये ८ हजार कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळ देण्यात आल्या. परंतु तांत्रिक कारण पुढे करून त्या चालत नसल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला. ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ घड्याळ चालत नसल्याचे सांगून ही योजना बंद करण्यात आली. परंतु नोव्हेंबर २०१९ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. मुंढे यांनी पदभार स्वीकारताच घड्याळ पूर्ण क्षमतेने काम करू लागली. सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन जीपीएस घड्याळाच्या उपस्थितीशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.