रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 10:35 AM2022-03-26T10:35:49+5:302022-03-26T10:42:57+5:30

चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

28 lakh was looted from 4 people in the name of TC job in railways | रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले

रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले

Next
ठळक मुद्देविदर्भातील बेरोजगारांना लाखोंचा गंडासरकारी कर्मचाऱ्याचाही आरोपी म्हणून सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :रेल्वेत तिकीट चेकरची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो तरुणांची एका टोळीने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला.

विजय मारोतराव साखरकर (२७, आराधनानगर) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सुरेंद्र तेलंग (५२, सीताबर्डी) आणि त्याचा पश्चिम बंगाल येथील साथीदार दिनेश प्रसाद या दोघांनी रेल्वेत तिकीट चेकरची (टीसी)ची नोकरी लावून देण्याचे २०१५ मध्ये आमिष दाखविले. विजयकडून त्यासाठी ८ लाख, ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर, अशाच प्रकारे चंद्रपुरातील तिघांकडून १९ लाख, ५० हजार घेतले. या चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर, या चौघांनी आरोपी तेलंगची गचांडी धरली. तो केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एका कार्यालयात नोकरी करतो. पोलीस कारवाईचा त्याला धाक दाखविल्यानंतर त्याने रक्कम परत करतो, असे सांगून ३० जून, २०१९ला काही धनादेश दिले. मात्र, खात्यात रक्कम नसल्याने ते वटलेच नाही. तेव्हापासून रक्कम मिळावी, म्हणून आरोपींकडे साखरकरसह अन्य तरुण तगादा लावून होते. तो रक्कम परत करणार नाही, अशी खात्री पटल्याने, अखेर त्यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदविली. द्वितीय पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, गुरुवारी रात्री तेलंग आणि प्रसाद या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

ओसाड ठिकाणी पाच महिने प्रशिक्षण

पीडित तरुणांच्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्यानंतर, त्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली कोलकाताजवळच्या एका गावातील ओसाड इमारतीत तब्बल पाच महिने ठेवले. यात साखरकर आणि चंद्रपुरातील तीन असे चार जण व देशाच्या इतर भागातील २० तरुण होते. त्यांना तेथे खाण्या-पिण्याचीही सोय नव्हती. जे खायचे, प्यायचे आहे, ते तुम्हीच आणा आणि तुम्हीच खा, असे सांगितले जायचे. कधीतरी एखादी ट्रेन यायची अन् हे तरुण टीसी म्हणून बाहेरूनच कर्तव्य कसे बजावायचे, त्याचे प्रात्यक्षिक करायचे.

फसवणूक झालेला तरुण पोलिसाचा मुलगा

या टोळीने देशभरातील अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, नागपुरात दोन वर्षांपूर्वी असाच एक गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळीही अशाच पद्धतीने तरुणांची फसवणूक झाली होती. रेल्वेत अशी नोकरी मिळत नाही, हे माहिती असूनही बेरोजगार तरुण लाखो रुपये दुसऱ्यांच्या हातात घालून फसवणूक करून घेतात. या प्रकरणातील तक्रारदार विजय हा निवृत्त पोलीस कर्मचारी मारोतराव साखरकर यांचा मुलगा होय, तर केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीला असूनही अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीत सहभागी झालेला तेलंग हा नागपुरातील पहिलाच आरोपी असावा.

Web Title: 28 lakh was looted from 4 people in the name of TC job in railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.