नागपुरातील २८ सॉ मिल असुरक्षित; पाचला सील ठोकण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:26 AM2019-05-14T00:26:20+5:302019-05-14T00:27:38+5:30
मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील २८ सॉ मिल असुरक्षित घोषित केलेल्या आहेत. तसेच पाच सॉ मिल सील करण्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत. शहर व लगतच्या भागातील सॉ मिलला आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. आग नियंत्रणाची यंत्रणा नसल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याचे विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील २८ सॉ मिल असुरक्षित घोषित केलेल्या आहेत. तसेच पाच सॉ मिल सील करण्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत.
शहर व लगतच्या भागातील सॉ मिलला आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. आग नियंत्रणाची यंत्रणा नसल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याचे विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. अग्निशमन विभागाच्या कळमना केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १६ सॉ मिलने मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. लकडगंज झोन क्षेत्रातील १० तर कॉटन मार्के ट परिसरातील दोन सॉ मिल असुरक्षित आहेत.
सॉ मिल चालक मानकानुसार उपाययोजना करीत नसल्याने आगीचा धोका अधिक असतो. आग लागल्यास आजूबाजूच्या निवासी क्षेत्रात ही आग पसरण्याचा धोका असतो. हा गंभीर प्रकार आहे. सॉ मिल शहरालगतच्या भागात अधिक होत्या. परंतु मागील काही वर्षांत शहराचा विस्तार झाल्याने या सॉ मिल निवासी क्षेत्रात आल्या आहेत. असे असूनही सॉ मिल चालक आग नियंत्रणासाठी उपाययोजना करीत नसल्याने, अशा सॉ मिलला सील ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मिल परिसरात आग विझविण्यासाठी स्प्रिंकलरची व्यवस्था, फायर अलार्म नाही. लाकडाचा साठा खुल्या जागेत ठेवला जातो. यामुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो. याचा विचार करता सॉ मिल परिसरात विहिरी असणे गरजेचे आहे. कळमना केंद्राने १६ सॉ मिलचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. लकडगंज व कॉटन मार्केट भागातही संबंधितावर कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे नोटीस बाजवल्यानंतरही काही सॉ मिल उपाययोजना न करता सर्रास सुरू आहेत.