कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये रेल्वेतून आल्या २८० कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:18 AM2018-05-27T00:18:42+5:302018-05-27T00:18:52+5:30
मिहान आता खऱ्या अर्थाने लॉजिस्टिक पार्क बनला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (कॉन्कोर) मिहानमधील मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये गुडगांवच्या खटवास डेपोतून २८० कार रेल्वेने २३ मे रोजी आणण्यात आल्या. या सोबतच कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये मध्य भारताकरिता व्यावसायिक सेवा सुरू झाली आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेमुळे वाहतूक खर्चात ४० टक्के कपात होत असल्याची माहिती कॉन्कोरचे मुख्य महाव्यवस्थापक अनुपकुमार सत्पथी यांनी अजनी इनलॅण्ड डेपोमध्ये शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान आता खऱ्या अर्थाने लॉजिस्टिक पार्क बनला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (कॉन्कोर) मिहानमधील मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये गुडगांवच्या खटवास डेपोतून २८० कार रेल्वेने २३ मे रोजी आणण्यात आल्या. या सोबतच कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये मध्य भारताकरिता व्यावसायिक सेवा सुरू झाली आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेमुळे वाहतूक खर्चात ४० टक्के कपात होत असल्याची माहिती कॉन्कोरचे मुख्य महाव्यवस्थापक अनुपकुमार सत्पथी यांनी अजनी इनलॅण्ड डेपोमध्ये शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
सत्पथी म्हणाले, मिहान पार्कमध्ये कॉन्कोरद्वारे कंटेनरसह वॅगन हॅण्डलिंग (प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल) सेवा देण्यात येते. सध्या खापरीमध्ये लूप लाईन आहे. याद्वारे सध्या २८० मारुती कारची खेप मिहान पार्कमध्ये पोहोचली आहे. रेल्वेने कार वा अन्य उत्पादन आणल्याने वेळ, वाहतूक खर्चाची बचत आणि उत्पादनाची चोरी व खराब होण्याची शक्यता नसते. मध्य रेल्वे, नागपूर मंडळातर्फे खापरी येथे रेल्वे स्टेशन, अतिरिक्त एक लूप लाईन, सिग्नल, केबिन आदींचे काम होणार आहे. या कामासाठी कॉन्कोरने ४६ कोटी रुपये दिले आहे.
हे काम लवकरच पूर्ण होण्यासाठी कॉन्कोरतर्फे मंडळ रेल्वे व्यवस्थापन स्तरावर चर्चा करण्यात येत आहे. आता नवीन डीआरएम सोमेश कुमारसोबत या प्रश्नावर चर्चा करून रेल्वे संबंधित कार्य लवकरच पूर्ण करण्याची विनंती करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच प्रत्येक महिन्यात पार्ककरिता ४ ते ६ रॅक (रेल्वे) हॅण्डल करता येईल. यासोबतच कॉन्कोरला पूर्ण क्षमतेने काम करता येईल.
पत्रपरिषदेत कॉन्कोरचे मुख्य व्यवस्थापक राजीब भोवाल, अतिरिक्त अधिकारी (सी अॅण्ड ओ) सुनील वालदे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी होणार चार मोठे वेअरहाऊस
सत्पथी म्हणाले, कॉन्कोरच्या मिहानमधील १२० एकरातील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये ६० हजार चौरस फूट जागेत दोन वेअरहाऊस बनविण्यात आले आहेत. याच आकाराच्या दोन वेअरहाऊसचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होतील. यासोबत आणखी दोन वेअरहाऊसचा प्रस्ताव आहे. यामुळे मिहान पार्कमध्ये कॉन्कोरचे सहा मोठे वेअरहाऊस होतील. यामुळे मध्य भारताची वेअरहाऊसची समस्या दूर होणार आहे.