नागपूर विभागात २,८०१ ‘लम्पी’ बाधित जनावरांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:16 AM2020-08-19T11:16:04+5:302020-08-19T11:18:59+5:30
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सध्या लम्पी स्कीन डिसीज जनावरांमध्ये आढळून येत असल्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सध्या लम्पी स्कीन डिसीज जनावरांमध्ये आढळून येत असल्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. या आजाराची देशपातळीवर दखल घेतली जात असून नागपूर विभागामध्ये २ हजार ८०१ जनावरे या आजाराने बाधित असल्याची नोंद प्रादेशिक पशुसंवर्धन कार्यालयाकडे झाली आहे.
आंध्रप्रदेशातून सिरोंचा (जि. गडचिरोली) या तालुक्यात मंढीकुटा, चिंतनपल्ली, सिरोंचा, तामंडाळा या भागामधून महाराष्ट्रामध्ये या रोगाचा शिरकाव झाल्याची नोंद पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे आहे. एप्रिल महिन्यात या जनावरांच्या रक्तांचे आणि स्रावांचे नमुने भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऑॅनिमल डिसीजेस या प्रयोगशाळेत तपासले असता लम्पी स्किन डिसीज असल्याचे निष्पन्न झाले.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये २ लाख ५४ हजार २९२ बैल, गायी, म्हशी आहेत. हा आजार विशेषत: पांढऱ्या रंगाच्या जनावरांना अधिक होतो. संकरित जनावरांच्या वासरांना याचा धोका अधिक असतो. मात्र या तुलनेत म्हशींना यापासून धोका कमी असतो. या संदर्भात नागपूर विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त के. एस. कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांना लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत ४८ हजार ८४० जनावरांचे लसीकरण झाले असून भंडारा जिल्ह्यात १९,९६२, चंद्रपूर जिल्ह्यात १,१५० तर गडचिरोली जिल्ह्यात २६,७२८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने लक्षणे आढळल्यास जनावरांना तातडीने अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे, अशा सूचना राज्य शासनाच्या पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या रोग नियंत्रण शाखेने दिल्या आहेत. म्हशींना गायींसोबत न बांधता त्यांना वेगळे ठेवावे, अशाही सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत.
या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी बाधित जनावरांसोबतच इतरही जनावरांना गोट फॉक्स व्हॅक्सिन ही लस दिली जात आहे. शासनाकडून तसेच जिल्हा नियोजन विकास निधीच्या माध्यमातून ही लस खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्याही सूचना आहेत.
अशी असतात लक्षणे
या आजाराची लागण झालेल्या जनावरांना ताप येतो. अंगावर गाठी येतात. नाकातून तसेच डोळ्यातून स्राव वाहतो. त्यांना अशक्तपणा जाणवतो. चारा खाणे मंदावते. त्यांच्या दुधावरही परिणाम होतो. जनावरांच्या अंगावर विशेषत: मागील पायांवर सूज येते.
नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. यासाठी शासनाकडून आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. या आजाराने जनावरे दगावल्याची आतापर्यंत नोंद झालेली नाही.
_ के.एस. कुंभारे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपूर