रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या घरांसाठी २८५ कोटी
By admin | Published: August 22, 2015 03:08 AM2015-08-22T03:08:42+5:302015-08-22T03:08:42+5:30
नगररचना विभागाने १५ वर्षापूर्वी मंजुरी दिलेल्या शहर विकास आराखड्यानुसार जुना भंडारा रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.
स्थायी समितीचा ठराव : सभागृहाची मंजुरी घेणार
नागपूर : नगररचना विभागाने १५ वर्षापूर्वी मंजुरी दिलेल्या शहर विकास आराखड्यानुसार जुना भंडारा रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. रुंदीकरणात जाणाऱ्या मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २८५ कोटीची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला जाणार आहे.
जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची तरतूद करण्याबाबत मनपा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यात मेयो रुग्णालय ते गांजाखेत चौक, गांजाखेत चौक ते शहीद चौक व शहीद चौक ते सुनील हॉटेल या रस्त्याचा समावेश आहे. जुना भंडारा रस्त्याच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. २००० मध्ये नगर विकास विभागाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात हा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. परंतु मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने आता रस्ता ९ मीटर झाला आहे. १३ जानेवारी २०१० रोजी अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती. १९ नोव्हेंबर २०१० उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढून मनपा प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. निधी नसल्याने तसेच ४०० मालमत्ताधारकांना याचा फटका बसणार असल्याने मनपाने ही कारवाई टाळली होती. परंतु आता रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी २८५ कोटीची तरतूद करण्याचा प्रस्ताव समितीने मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला आहे.(प्रतिनिधी)