गर्भ सिकलसेल उदरातही पोहचल्याने २९ महिलांनी केला गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 11:46 AM2021-12-15T11:46:39+5:302021-12-15T12:01:13+5:30

गरोदर माता ‘एसएस पॅटर्न’ची असल्यास गर्भातील बाळाच्या नाळेतून छोटा टिश्यू काढून त्याची ‘कोरीओनिक विल्स सॅम्पलिंग’ (सीव्हीएस) चाचणी केली जाते. या चाचणीतून गर्भातला जीव सिकलसेलग्रस्त आहे का, याचे निदान होते.

29 women had abortions due to fetal sickle cell reaching the abdomen | गर्भ सिकलसेल उदरातही पोहचल्याने २९ महिलांनी केला गर्भपात

गर्भ सिकलसेल उदरातही पोहचल्याने २९ महिलांनी केला गर्भपात

googlenewsNext
ठळक मुद्दे१६२ महिलांची गर्भजल तपासणी

सुमेध वाघमारे

नागपूर : गर्भजल परीक्षणामधून सिकलसेलग्रस्त गर्भ असल्याचे निदान झालेल्या २९ महिलांनी काळजावर दगड ठेवून गर्भपात केला तर, दोन महिलांनी नाईलाजाखातर सिकलसेलग्रस्तांना जन्म दिला. मागील दहा वर्षांतील ही आकडेवारी एकट्या डागा रुग्णालयातील आहे.

सिकलसेलवर अद्याप कोणतेही प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. विवाहापूर्वी घेतलेल्या दक्षतेमुळेच हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. मात्र, जनजागृतीची कमी, शासकीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अभावामुळे विदर्भात हा आजार वाढतच चालल्याचे चित्र आहे.

सिकलसेल तपासणीसाठी सर्वप्रथम गर्भवतीची ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ केली जाते. यातून केवळ सिकलसेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे निदान होते. यानंतर ‘कन्फर्मेशन टेस्ट’ (इलेक्ट्रोफोरेसिस) केली जाते. या चाचणीद्वारे ‘पॅटर्न कन्फर्म’ होते. यानंतर ‘एसएस पॅटर्न’ असलेल्या रुग्णांची ‘एचपीएलसी’ (हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमाटोग्राफी टेस्ट) केली जाते. गरोदर माता ‘एसएस पॅटर्न’ची असल्यास गर्भातील बाळाच्या नाळेतून छोटा टिश्यू काढून त्याची ‘कोरीओनिक विल्स सॅम्पलिंग’ (सीव्हीएस) चाचणी केली जाते. या चाचणीतून गर्भातला जीव सिकलसेलग्रस्त आहे का, याचे निदान होते. गर्भातला जीव जर, ‘एसएस पॅटर्न’मधला असेल तर, गर्भपात करण्याचा सल्ला दिला जातो.

६११ सिकलसेलबाधित जोडप्यांची तपासणी

डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात २०११ ते २०२१ दरम्यान ६११ सिकलसेलबाधित जोडपी तपासणीसाठी आली. त्यापैकी २१४ गर्भवती महिलांनी गर्भजल तपासणी केली. ‘सीव्हीएस’ तपासणीसाठी गर्भ हा ९ ते १२ आठवड्यांचा असावा लागतो. ४२७ महिलांच्या गर्भाला यापेक्षा जास्त आठवड्यांचा कालावधी झाल्याने त्यांची तपासणी होऊ शकली नाही. १६२ महिलांची गर्भजल तपासणी (सीव्हीएस) करण्यात आली. त्यापूर्वी त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यात ३१ महिलांमधील पोटातील बाळ सिकलसेलग्रस्त म्हणजे ‘एसएस पॅटर्न’ असल्याचे निदान झाले. त्यातील २९ महिलांनी गर्भपात केला तर, २ महिलांनी विविध कारणांनी सिकलसेलग्रस्त बाळाला जन्म दिला.

यामुळे सिकलसेलग्रस्त मूल जन्माला येते

सिकलसेल हा अनुवांशिक आजार आहे. जो आई- वडिलातून मुलांना होतो व एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. सिकलसेल आजाराचे दोन प्रामुख्याने प्रकार आहेत. सिकलसेल वाहक (एएस) व सिकलसेल पीडित (एसएस). दोन्ही ‘एएस पॅटर्न’शी लग्न झाल्यास २५ टक्के मूल सामान्य किंवा ‘एएस पॅटर्न’ किंवा ‘एसएस पॅटर्न’चे मूल जन्माला येण्याची शक्यता असते. सामान्य व्यक्ती (एए पॅटर्न) आणि ‘एसएस’ पॅटर्नच्या जोडप्याकडून ‘एएस’पॅटर्नचे मूल जन्माला येण्याची शक्यता २५ टक्के होते. यामुळे लग्नापूर्वी सिकलसेलची चाचणी करणे गरजेचे ठरते.

जनजागृतीमुळे पहिल्या गर्भधारणेच्या वेळीच सिकलसेल तपासणी

पूर्वी पहिला मुलगा सिकलसेलबाधित जन्माला आल्यानंतर दुसऱ्या मुलाच्या वेळी दाम्पत्य सिकलसेलची तपासणी करायचे. परंतु आता पहिला गर्भ राहिल्यावर सिकलसेलची तपासणी केली जात आहे. यामुळे सिकलसेल मूल जन्माला येण्यावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. परंतु अजूनही याची व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे.

- डॉ. अलका पाटणकर, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, मेयो

Web Title: 29 women had abortions due to fetal sickle cell reaching the abdomen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.