२९३ कोटींचे कार्यादेश कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:31+5:302020-12-30T04:10:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पानुसार कार्यादेश झालेली २९३ कोटींची विकास कामे सभागृहात महापौरांनी आदेश दिल्यानंतरही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पानुसार कार्यादेश झालेली २९३ कोटींची विकास कामे सभागृहात महापौरांनी आदेश दिल्यानंतरही तत्कालीन आयुक्तांनी रोखली. मागील ११ महिन्यात एकाही विकास कामाला मंजुरी नाही. प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर आयुक्तांच्या अनुपस्थित स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी यावर संताप व्यक्त केला. कामे का रोखली असा सवाल केला. परंतु उपस्थित तिन्ही अतिरिक्त आयुक्तांनी यावर स्पष्टीकरण देण्याला असमर्थता व्यक्त केली. सदस्यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक घेण्याची मागणी केली. यामुळे मंगळवारची बैठक रद्द करावी लागली.
बैठकीत प्रस्ताव पुकारताच काँग्रेसचे सदस्य दिनेश यादव यांनी रोखलेल्या कामावर स्पष्टीकरण मागितले. या वर्षात एकाही विकास कामाला मंजुरी नाही. प्रशासनानेही यावर सहमती दर्शविली. विकास कामावर तोडगा न निघाल्याने बुधवारी आयुक्तांच्या उपस्थितीत समितीची पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी पत्रकारांना दिली.
वास्तविक २९३ कोटीच्या कामांना प्रदीप पोहाणे यांच्या कार्यकाळात आदेश देण्यात आले होते. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात नवीन कामांचा समावेश न करता कार्यादेश झालेल्या कामांसाठी निधीची तरतूद केली. परंतु अर्थसंकल्प सादर करून दोन महिने झाले तरी कार्यादेश झालेली कामे कागदावरच आहेत. आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध होत नसेल तर समितीत प्रशासनाच्या कोणत्याही प्रस्तावाला मंजुरी देऊ नये ,अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली.
....