जिल्ह्यातील २९५२७ विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा; शहर आणि ग्रामीणमध्ये २०३ परीक्षा केंद्र
By गणेश हुड | Published: February 16, 2024 07:04 PM2024-02-16T19:04:33+5:302024-02-16T19:05:42+5:30
मागील तीन वर्षांत या परीक्षेकरीता प्रविष्ठ विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
नागपूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीची संपुर्ण राज्यात रविवार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील २९ हजार ५२७ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असून जिल्ह्यातील २०३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पुरेशा मार्गदर्शना अभावी मागे पडतात. स्पर्धा परीक्षांमधील पहिली पायरी म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा होय. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘एक तास शिष्यवृत्ती साठी’ हा उपक्रम राबवला जातो. यामुळे मागील तीन वर्षांत या परीक्षेकरीता प्रविष्ठ विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांच्या या परीक्षेतील प्रवेश व परीक्षा शुल्कापोटी १५ लक्ष रुपयांची तरतूद जि.प. सेंस फंडातून केली आहे. यातुन जि.प. शाळांमधील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांची परीक्षेची फी भरण्यात आलेली आहे. जिल्ह्याचा सन २०२१ च्या मुख्य परीक्षेच्या पात्रता निकालाच्या टक्केवारीच्या तुलनेत सन २०२३ च्या निकालात चारपट वाढ झालेली असून हा एक तास शिष्यवृत्तीसाठी उपक्रम जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या सराव परीक्षेचा लाभ निश्चितच विद्यार्थ्यांना मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेत होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार यांनी दिली. सीईओ सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दिली.