चार वर्षांत तयार झाली २,९८० घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:09 AM2021-08-15T04:09:49+5:302021-08-15T04:09:49+5:30
नागपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए) माध्यमातून चार वर्षात २,९८० घरांचे बांधकाम पूर्ण केले ...
नागपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए) माध्यमातून चार वर्षात २,९८० घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे. एकूण ४,३४५ घरांचे बांधकाम करावयाचे आहे. एनएमआरडीए वगळता महापालिकेच्या वतीने स्वस्त घरासाठी सक्रियता दाखविण्यात आली नाही. कोरोनाच्या काळात बांधकाम थंडबस्त्यात पडले होते. आधी स्वस्त घर नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) तयार करीत होते. त्यानंतर हा प्रकल्प एनएमआरडीएच्या हातात गेला. आतासुद्धा ३१.४१ टक्के घरांचे बांधकाम राहिले आहे.
नासुप्रला स्वस्त घरासाठी ३,३७० अर्ज मिळाले. यापैकी सोमवारी ड्रॉच्या माध्यमातून स्वस्त घरांचे वितरण करण्यात येणार आहे. ज्यांना घर मिळणार त्यांची नावे वेबसाईटवर घोषित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या (शहर) ३ अंतर्गत सन २०१८ पासून नासुप्रच्या घरकुल योजनेचे काम सुरू झाले. १८ ऑगस्ट २०१९ रोजी ४,३४५ पैकी ४,१७२ घरांसाठी ड्रॉ काढण्यात आला. यापैकी १,१०२ लाभार्थ्यांनी पहिली किस्त भरली. यापैकी आतापर्यंत ९१९ लाभार्थ्यांनी पूर्ण रक्कम जमा केली. यापैकी घरकुल योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने १.५० लाख आणि राज्य शासनाच्या वतीने एक लाखासह २.५० लाखाचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना जमा करावी लागणार आहे. एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, कोरोनामुळे ड्रॉ व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री व एनएमआरडीएचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ड्रॉ काढण्यात येईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने उपस्थित राहतील.
............
घरकुल योजनेची स्थिती
- नासुप्रनुसार खसरा क्रमांक १२/१-२ मौजा वांजरीत ७६५ घरांपैकी ५८३ फ्लॅटचे काम शिल्लक आहे.
- खसरा क्रमांक ६२ मौजा तरोडी(खुर्द)मध्ये ९४२ पैकी ६६० घरांचे काम शिल्लक आहे.
- खसरा क्रमांक ६३ मौजा तरोडी(खुर्द)मध्ये २,३४७ घरांपैकी १,७३७ फ्लॅटचे काम शिल्लक आहे.
...............